शेवगाव प्रतिनीधी, दि. २० : अहिल्यानगर येथील स्नेहालय परिवार संचलित अनाथ व ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी समाजाच्या सहकार्याने सुरू असलेल्या येथील उचल फाऊंडेशनच्या ३५ मुला मुलींसाठी शेवगाव रोटरी क्लब चे सदस्य तथा कर सल्लागार केदार मंत्री यांनी ट्रॅक – सुट मोफत दिले आहेत.
यावेळी रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा, अध्यक्ष प्रा. डॉ. काकासाहेब लांडे, सेक्रेटरी मोहमंद वसिम, भागनाथ काटे, वसुधा सावरकर, मिनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. लड्डा म्हणाले, वंचित घटकांना निस्वार्थभावनेने राबविलेला मंत्री यांचा उपक्रम कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
मंत्री म्हणाले, सध्या थंडीचे दिवस व्यायामाला पोषक आहेत. अनाथ व ऊसतोड कामगारांच्या मुलांनी अभ्यासाबरोबर व्यायाम करून त्यांनीही शरीर संपदा कमवावी या हेतुने ट्रॅक सुट देण्याचा विचार केला. उचल फाऊंडेशनला दिली जाणारी देणगी व मदत ही आयकर सुट पात्र असल्याने समाजाने वंचित घटकांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. फाऊंडेशनचे सचिन खेडेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सुजाता खेडेकर यांनी आभार मानले.