के.बी. दादांची तिसरी पिढी त्यांचे स्वप्न कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करत आहे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ :   “स्वातंत्र्योत्तर काळात अर्थात १९६० च्या दशकातलं  महाराष्ट्राचं वातावरण हे वेगळं होतं. शेतकरी-शेतमजुरांची पिढी शिकली पाहिजे, ही जाणीव त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब जगदाळे व गाडगेबाबांची  होती त्याच पंक्तीत अ.नगर  जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुलं शिकली तरच महाराष्ट्र पुढे जाईल. अशा धारणांच्या आधारे आजचे शिक्षक, प्राध्यापक, वकील व इंजिनिअर यांची पिढी घडवणाऱ्या के. बी. साहेबांच्या नंतर ही त्यांची तिसरी पिढी देखील भि. ग. रोहमारे  ट्रस्टच्या माध्यमातून हा महाराष्ट्र पातळीवरचा अत्यंत मानाचा ग्रामीण साहित्य पुरस्कार अव्याहतपणे देत आहे ही निश्चितच खूप मोठी गोष्ट आहे. 

आजच्या ग्रामीण लेखकांनी आई-बाबांच्या दुःखाच्या कहाण्यांपेक्षा आजचे शेती व शिक्षणाचे बदलते प्रश्न समजाऊन घेऊन शोषित व नडलेल्या कृषी जनसंस्कृतीचे प्रश्न प्रखरपणे मांडण्याची गरज आहे असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार डॉ. राजन गवस यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या साकरबेन सोमैया सभागृहामध्ये आयोजित के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध भाषा अभ्यासक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे होते. तर भि. ग. रोहमारे ट्रस्टचे सचिव रावसाहेब रोहमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक व भाषा अभ्यासक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे म्हणाले की “के. बी. साहेब हे थोर लोकनेते होते.  स्वातंत्र्यानंतर वसाहतीतून मुक्त झालेला भारत घडवण्याचं स्वप्न बघणाऱ्या पिढीचे सदस्य असलेल्या के. बी. दादांनी हा ‘भि.ग. रोहमारे ट्रस्ट’ स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून अनेक नवोदित ग्रामीण साहित्यिकांना पुरस्कृत केले, ही निश्चितच एक ऐतिहासिक घटना आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सोमैया महाविद्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी म्हणाले होते की “लोकांची भाषा ही ज्ञानाची भाषा झाली पाहिजे आणि म्हणूनच पुढे नाशिक येथे मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. कदाचित के. बी. साहेबांसारख्या नेत्यांकडे बघूनच यशवंतराव चव्हाण यांनी हे उद्गार काढले असावेत. तत्कालीन सर्व चळवळींचे नेतृत्व करणाऱ्या के.बी. दादांची तिसरी पिढी आज त्यांचे स्वप्न कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करते आहे. कोपरगाव सारख्या एका ग्रामीण तालुक्याच्या ठिकाणावरून हा तोलामोलाचा पुरस्कार देत आहे ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. मी सर्व पुरस्कार प्राप्त लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. “

भि. ग. रोहमारे ट्रस्टच्या वतीने प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ऍड. राहुल रोहमारे म्हणाले की, “के. बी रहमारे उर्फ दादा हे गांधीवादी विचारसरणीचे राजकारणी व समाजकारणी तसेच शिक्षणमहर्षी होते.  त्यांच्याच पुण्याईमुळे गेली ३५ वर्ष हा पुरस्कार इथे दिला जातोय.  यापुढे देखील अशाच पद्धतीने हा पुरस्कार सुरू राहील आणि पुढील वर्षी पुरस्काराची रक्कम देखील वाढविण्यात येईल. आज संस्था व महाविद्यालयाचा वाढलेला नावलौकिक सर्वश्रुत आहे.”

पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या भावना व्यक्त करताना कादंबरीकार रवी राजमाने म्हणाले की “आज भाऊ भावाला शेतात जायला वाट देत नाही. माणूस मरतो तरी त्याला स्मशानात पोहोचवायला वाट मिळत नाही. या आणि अशा प्रश्नांवर समाजाने जागृत झाले पाहिजे. शाळा बंद पडत आहेत . आधी ग्रामीण भाग सुधारावा तरच देश सुधारेल.” तर कथाकार महादेव माने व कादंबरीकार विठ्ठल खिलारी यांनीही आपापल्या सुखद प्रतिक्रिया व्यक्त केल्या कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी के.बी. साहेबांचा उल्लेख ‘के.बी. रोहमारे या महावृक्षाला वंदन’ असा करत आपल्या मर्मस्पर्शी कवितेने श्रोत्यांना खिळवून ठेवले. 

पुरस्कारप्राप्त कवी तान्हाजी बोऱ्हाडे व आत्मकथन लेखक डॉ.देविदास तारू यांनीही आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत भि.ग. रोहमारे ट्रस्टचे आभार मानले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथींचे स्वागत व प्रास्ताविक करताना प्र. प्राचार्य डॉ.  विजय ठाणगे यांनी महाविद्यालयाच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आलेख प्रस्तुत करत के. बी. साहेबांच्या योगदानावर प्रकाशझोत टाकला. कार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे यांनी  भि. ग. रोहमारे   ट्रस्टची स्थापना व पुरस्कार योजनेची पार्श्वभूमी कथन करताना सांगितले की “गेल्या ३५ वर्षापासून अव्याहतपणे भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार दिला जातोय. 

या पुरस्कार योजनेत संयोजक आणि परीक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.  कुठल्याही बाह्यहस्तक्षेपाविना निवड समिती काम करते.  आज पर्यंत १८३ ग्रामीण साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविले गेले असून त्यातील अनेकांना साहित्य अकादमीसह इतर मोठे मानसन्मान लाभले आहेत.” त्याचबरोबर त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय  करून दिला.

चालू वर्षी रवी राजमाने यांना ‘मव्हटी’ व प्रा. विठ्ठल खिलारी यांना ‘सवळा’ या ग्रामीण कादंबऱ्यांसाठी (विभागून) प्रत्येकी रुपये ७५००/-, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके,  महादेव माने यांना ‘वसप’ या ग्रामीण कथासंग्रहासाठी रु. १५०००/-, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके, ऐश्वर्य पाटेकर व तान्हाजी बोर्हाडे यांना क्रमशः कासरा व जळताना भुई पायतळी या ग्रामीण कविता संग्रहांसाठी (विभागून) ७५००/-  सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व बुके,तर डॉ. देविदास तारू यांना ‘आता मव्हं काय’ या ग्रामीण आत्मकथनासाठी १५०००/- , सन्मान चिन्ह व सन्मानपत्र प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले.

सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. वर्षा आहेर यांनी केले. तर डॉ. संतोष पगारे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. याप्रसंगी पत्रकार लक्ष्मण जावळे,  संतोष जाधव, को.ता.एज्यु. सोसायटीचे सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, भि. ग. रोहमारे ट्रस्ट चे सचिव रमेशराव रोहमारे, संस्थेचे विश्वस्त, मा. रोहिदास होन, मा. संदीप रोहमारे, ऍड. राहुल रोहमारे, आदी अनेक सन्माननीय सदस्य तसेच पत्रकार श्री दीक्षित, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी श्री जगताप, श्री जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, डॉ. रवींद्र जाधव, डॉ. वसुदेव साळुंखे, डॉ. नामदेव ढोकळे, डॉ. एस एस नागरे इतर सर्व प्राध्यापक व  प्राध्यापकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply