काळे कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी कामगारांचे ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

कोपरगाव pप्रतिनिधी, दि.१६ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र, चासनळी यांच्या सहकार्याने कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे व चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी कामगारांची मोफत सर्व रोग तपासणी शिबीर संपन्न झाले आहे. या शिबिरात ज्या ऊस तोडणी कामगारांना असलेल्या विविध आजारांवर आवश्यक मोफत औषधोपचार करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ऊस तोडणी मजुरांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या निर्देशाची अमलबजावणी करतांना बुधवार (दि.१६) रोजी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या वसाहतीमध्ये मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे व्हा.चेअरमन डॉ.मच्छिंद्र बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे म्हणाले की, प्रत्येक साखर कारखान्याचा ऊस तोडणी कामगार अत्यंत महत्वाचा घटक आहे. ऊसतोडणी करण्याचे काम अतिशय कष्टाचे असल्यामुळे ऊसतोडणी कामगारांचे  स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांना भविष्यात मोठ्या व्याधी जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोडणी कामगारांचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी दरवर्षी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करून ऊसतोडणी कामगारांची तपासणी केली जाते. याशिवाय ऊस तोडणी मजुरांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच मुलांसाठी साखर शाळा व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या शिबिराच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून तपासणीअंती निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे. 

ज्या ऊस तोडणी कामगारांना व त्यांच्या कुटुंबांना ज्या आजाराचे निदान झाले आहे. त्या आजारातून सुटका होण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेवून आपले व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. या आरोग्य शिबिरात ऊस तोडणी कामगारांचे रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, गरोदर महिलांची व लहान मुलांची तपासणी करण्यात आली.

या मोफत आरोग्य तपासणी शिबीर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन डॉ.मच्छिंद्र बर्डे, संचालक सूर्यभान कोळपे, कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, मुख्य शेतकी अधिकारी कैलास कापसे, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर हाळनोर, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.आर.जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक्षा पोखरकर, डॉ.सुवर्णा देवकर, डॉ. पूजा वाबळे, डॉ.अरुणा गाताडे, आरोग्य सहाय्यक रमजू शेख, आरोग्य सेवक रामेश्वर इंगळे, गणेश पवार यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सदर आरोग्य शिबीर प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप यांनी भेट दिली.