नववर्षाच्या निमीत्ताने साईनगरीत दोन लाखांवर भाविकांनी घेतले साईदर्शन 

शिर्डी प्रतिनिधी, दि. १ :  नववर्षाच्या निमीत्ताने साईनगरीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन लाखांवर भाविकांनी साईदर्शनाने  नवीन वर्षाची सुरूवात केली. गेल्या दोन दिवसांत तीन लाखांहून अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. नववर्षारंभी  एका भाविकाने २०६ ग्रॅमचा, साडेतेरा लाख रुपये किमतीचा सुवर्णहार साईबाबांना अर्पण केला आहे. शिर्डी पोलिसांच्या दुर्लक्षेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

साईसंस्थानने भाविकांना ऊन, वारा, पाऊस लागु नये म्हणून अद्यावत व वातानुकूलीत दर्शनबारी केली आहे. बुधवारी गर्दीने गेल्या काही वर्षातील वर्षाखेर व वर्षारंभातील गर्दीचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी  दर्शनरांग कॉम्प्लेक्सच्या बाहेर भाविकांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. साईसंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर भाविकांचे दर्शन सुकर व लवकर कसे होईल यासाठी सातत्याने स्व:त फिरून गर्दी व्यवस्थापन करत होते. गर्दीमुळे गावकरी गेट व सर्व प्रवेशद्वारेही काहीकाळ बंद ठेवण्यात आले.

नववर्षानिमीत्त साईमंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे़  वर्षारंभी साईमुर्तीवर सुवर्णालंकार घालण्यात आले होते. साईंच्या साक्षीने रविवारी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साईमंदिरात साईनामाचा व भजनांचा गजर करण्यात आला. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जि.प माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्यासह हजारो भाविकांनी मध्यरात्रीच साईदर्शन घेवून नववर्षाचा श्रीगणेशा केला. ३१ डिसेंबर रोजी साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले असल्याने १ जानेवारी रोजी पहाटेची काकड आरती झाली नाही.

संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, डेप्युटी सीईओ संदीप भोसले, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडूळे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके, प्रशांत सुर्यवंशी, अनिल धरम, साईप्रसाद खांडरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व अधिकारी गेले दोन दिवस अहोरात्र दर्शन व्यवस्था सुकर होण्यासाठी प्रयत्नांत आहेत.

बुधवारी दिवसभर भाविकांचा ओघ कायम होता़ पालख्या घेवून येणाऱ्या पदयात्रींचाही यात समावेश होता, शिर्डीत निवास व्यवस्था व वाहनतळे हाऊसफुल आहेत़ वाहनतळांची व स्वच्छतागृहांची नेहमीप्रमाणे वाणवा जाणवली. शहरातील उपनगरांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दोहो बाजुंना वाहनतळाचे स्वरूप आल्याने वाहतुक कोंडी झाली. मोबाईल व चप्पल ठेवण्यासाठी, लाडू पाकीटे घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यरात्री झालेल्या भाविकांच्या गर्दीने सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजवले. थेट मंदिरात शेकडो भाविकांची हातात मोबाईल घेवून नववर्षाचा ऐतिहासिक क्षण कैद करण्यासाठी झुंबड उडाली. 

Leave a Reply