कोपरगावच्या महसुली विभागाला लाच घेण्याची किड लागली
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : कोपरगावच्या महसुली विभागाला लाच घेण्याची किड लागली असुन तहसीलदारापासुन ते थेट खालच्या तलाठी कारकुनापर्यंत ही लागण लागली आहे. नुकतेच गुरुवारी कोपरगावच्या तलाठ्याला त्यांच्या पंटरसह लाच स्विकारताना लाचलुचपत नगर विभागाच्या पथकाने पकडल्याने महसुली विभागात खळबळ उडाली आहे.

या घटनेची पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोपरगावचा तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे याने शहरातील साईसीटी येथील एका नागरीकाकडे त्यांच्या सदनिकिची रितसर शासकीय नोंद करण्यासाठी साडेसहा हजारांची लाच मागितली. संबंधीत व्यक्तीने त्याची रितसर तक्रार अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

या तक्रारीची तातडीने दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक विजय ञिपुटे यांनी आपल्या पथकासह सापळा रचुन तलाठी गणेश सोनवणे याचा वसुली करणारा प्रखाजगी सहायक करण नारायण जगताप रा. साईसीटी याला त्याच परिसरात तक्रारदार यांच्याकडून रोख साडेसहा हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. करण जगताप याने कोणासाठी व का पैसे घेतले याची चौकशी लाचलुचपत पथकाने करून थेट मुख्य सुत्रधार तलाठी गणेश सोनवणे याच्या पर्यंत पोहचले.

मोबाईल वरून करण जगताप याने तलाठी गणेश सोनवणे याला सांगितले की, तुम्ही सांगितलेले पैसे मी घेतले आहेत. ते तुम्हाला पोहच करतो यावरून व्हाइस रेकाॅर्डसह पुरावा घेवून लाचलुचपत पथकाचे अधिकारी ञिपुटे यांनी तलाठी सोनवणेसह करण जगताप याला ताब्यात घेवून गजाआड केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकासह पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी जावून पंचासमक्ष चौकशीअंती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे व त्याचा खाजगी सहायक करण जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव महसुली विभागात अनेक वर्षांपासून तलाठी, कारकुनसह तहसीलदार चलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. लाच घेण्यावरुन अनेकांना अटक करण्यात आल्याच्या अनेक घटना घडूनही महसुली विभागाचे कर्मचारी सतर्क होण्याऐवजी पुन्हा पुन्हा लाच घेण्यासाठी धाडसाने पुढे येतात यावरून महसुली विभागाला लाच घेण्याची किड लागली आहे. दरम्यान आरोपी तलाठी गणेश सोनवणे व करण नारायण जगताप यांना दि. २ जानेवारी रोजी कोर्टात हजर केले असता त्यांना दि. ४ जानेवारी २०२५ पर्यंत १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
