कोपरगाव प्रतिनिधी, दि.४ : आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे सोळा वर्ष जनसंपर्क अधिकारी म्हणून राहिलेले, स्व. मोहन यादव यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध “श्री साई चरित्र दर्शन” या पुस्तकाची नवीन आवृत्ती साई भक्तांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे.

या पुस्तकात साईबाबांच्या जीवनाची आणि त्यांच्याशी संबंधित शिकवणींची अत्यंत सुलभ भाषा वापरून माहिती दिली आहे. नवीन आवृत्ती हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत प्रकाशित केली असून स्टर्लिंग पब्लिकेशन्स आणि प्राजक्त पब्लिकेशन्स यांनी या पुस्तकाचा प्रकाशन केले आहे. सुमारे तीन वर्ष त्यासाठी कालावधी लागला होता, या निमित्ताने त्यांची इच्छा पूर्ण झाली आज आहे अशी माहिती त्यांचे चिरंजीव ओंकार यादव यांनी दिली.

२०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथाचे आजवर १० भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत, ज्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, कोंकणी, पंजाबी, नेपाळी, तेलुगू, कन्नड, खासी आणि सिंहली आदींचा समावेश आहे. स्व. मोहन यादव यांच्या साध्या, सहज समजणाऱ्या सोप्या लेखनशैलीमुळे साईबाबांच्या जीवनाचे आणि तत्त्वज्ञानाचे वर्णन लाखो भक्तांसाठी अधिक सुलभ झाले आहे.

नवीन आवृत्तीत हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तीन प्रमुख भाषांतील संस्करणांचा समावेश आहे. ह्या आवृत्तीमुळे साईबाबांच्या शिकवणींचा अधिक व्यापक प्रसार होईल. हे पुस्तक बुक स्टॉल बरोबरच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. श्री साई चरित्र दर्शन या पुस्तकाने लाखो भक्तांना प्रेरणा दिली आहे.
