शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : मानवता धर्म टिकवण्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत. मुलांवर संस्काराचा अभाव असल्याने आज वृद्धाश्रमाच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहेत. त्यामुळे संस्कार केले तर संस्कृती टिकेल व संस्कृती टिकली तर धर्म आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकणार असल्याचे प्रतिपादन क्रातिंदूत पुरस्कार सन्मानित,अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांनी केले.

तालुक्यातील बोधेगावच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बोधेश्वर मंदिरात मंगळवारी (दि.७ ) रोजी राहुरी येथे संपन्न होत असलेल्या परमपूज्य गुरुमाऊलीं अण्णासाहेब मोरे यांच्या राष्ट्रीय महासत्संग सोहळा व श्री सिद्ध मंगल पादुका पुजनांच्या नियोजना संदर्भात मार्गदर्शन व हितगुज कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मोरे म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून पुढे जात असताना या मार्गातून जात, पात, धर्म बाजूला ठेवून आध्यात्मिक सेवा करा, बाल संस्कार केंद्र तरुण पिढी घडवण्याचे काम करत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के अध्यात्म या माध्यमांतून, ग्रामअभियानांतर्गत समृद्ध गाव आणि समृद्ध पिढी उभी करण्याचे काम सुरू आहे. विज्ञानाच्या माध्यमातून अध्यात्म जनतेला समजून सांगितले जाते. हे करत असताना बालसंस्कार विभागही ही सुरू आहे.

श्रीक्षेञ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी भव्य असे हॉस्पिटल उभे राहत आहे. यामध्ये प्रत्येकाचा वाटा असावा या दृष्टीने जनकल्याण योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भाविकांनी सहभागी व्हावे जेणेकरून दत्तधामानंतर आता आरोग्यधामही सर्वांच्या योगदानातून उभे राहावे, ही यामागची कल्पना असल्याने यामध्ये सर्वांनी योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी हातगाव, कांबी, गायकवाड, जळगाव, सुकळी, आंतरवाली, चापडगाव आशा विविध केंद्राचे केंद्र प्रमुखासह सेवेकरी मोठ्या संख्येने हजर होते.
