आत्मा मालीकच्या मैदानावर खेळल्याने आत्मिय उर्जा मिळते – गोरक्ष गाडीलकर 

जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : खेळाडूंना आत्मा मालीकच्या मैदानावर खेळल्याने आत्मिय उर्जा मिळते. कितीही काम असलं तरी किमान दररोज व्यायाम करुन विविध खेळ खेळले पाहीजेत. सदृढ शरीर असेल तर सदृढ आत्मा असतो आणि काम काज सुध्दा चांगलं होतं असे मत शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केले.

 कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मलिक शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय या स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, कोपरगावचे  तहसीलदार महेश  सावंत, श्रीकुमार चिंचकर, प्रसाद मते,  विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, आत्मा मालीक शैक्षणिक संकुलाचे प्रमुख सुधाकर मलीक, विश्वस्त बाळासाहेब गोर्डे आदी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला.

गाडीलकर पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्य वृध्दीसाठी वेळोवेळी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची गरज आहे. महसूल विभागाच्या कामामुळे व्यस्त दिनक्रम असतो, ज्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे कठीण होते. मात्र, आरोग्य टिकवण्यासाठी  खेळ महत्त्वाचे आहेत. सुदृढ शरीरातच सुदृढ आत्मा वास करतो, त्यामुळे आरोग्य चांगले असेल तर कामही उत्कृष्ट होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही दिवसांत या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. क्रिकेट, कबड्डी आणि इतर क्रीडा प्रकारांच्या सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी तहसीलदार, प्रांताधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी संयोजनासाठी विशेष मेहनत घेतली आहे. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व स्तरांवर सहकार्य मिळत आहे.

नंदकुमार सुर्यवंशी  म्हणाले की, चांगले आरोग्य ठेवण्यासाठी खेळाची गरज आहे. लोकांचे शासकीय  कामे करण्यामध्ये स्वताच्या शरीराकडे दुर्लक्ष केले  जाते. ज्या महसुली विभागात मी  जनसेवेचे काम केलो होतो  आज त्याच महसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा  सेवा करण्याची संधी मला पुन्हा मिळाली. खेळाडू कर्मचाऱ्यांच्या वतीने राजेंद्र आंधळे यांनी मनोगत व्यक्त केले.

 आत्मा मालीक क्रीडा संकुलाच्या मैदानावर महसुली विभागाचे विविध अधिकारी आपली क्रीडा कौशल्य दाखवून मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले होते. उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, मार्चपथ संचलन, मशाल प्रज्वलित करून व आकाशात फुगे सोडून क्रीडा स्पर्धांना सुरूवात झाली.

या क्रीडा स्पर्धेत अहिल्यानगर टायगर्स (जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर प्रांत, अहिल्यानगर तहसील व नेवासा तहसील ) अहिल्यानगर साऊथ वॉरीयर्स (कर्जत, जामखेड, श्रीगोंदा व  पारनेर) अहिल्यानगर रॉयल्स (पाथर्डी, शेवगाव, राहुरी, श्रीरामपूर ) आणि प्रवरा पॅंथर्स (राहाता, कोपरगाव, अकोले व संगमनेर) या संघांनी सहभाग घेतला‌ आहे. या स्पर्धा १६ व १८ जानेवारी २०२४ या कालावधीत पासुन मैदानी खेळ सुरु झाले.

१६ जानेवारी रोजी या चार संघात १२ षटकांचे क्रिकेट सामने संपन्न झाले. १७ जानेवारी रोजी पुरूष व महिला खेळाडूंचे १००, २०० व ४०० मीटर वैयक्तीक धावणे व ४०० मीटर रिले स्पर्धा, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुध्दीबळ, गोळाफेक, थाळीफेक, भाला फेक, लांब उडी, उंच उडी या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. १८ जानेवारी रोजी फुटबॉलसह इतर सर्व क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामने संपन्न होऊन समारोप होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक आहेर यांनी केले. तर  क्रीडा स्पर्धांचे संयोजन कोपरगाव तहसीलदार महेश सावंत व राहाता तहसीलदार अमोर मोरे यांनी उत्तम नियोजन केले.

Leave a Reply