प्रवरा शैक्षणिक संकुलाचे कार्य लौकिकास पात्र – बागुल

शेवगाव प्रतिनिधी, दि. १: प्रवरा शैक्षणिक समूहाच्या शेवगाव येथील पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील सीबीएसई स्कूलने तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले असून निकालाची उत्कृत्ष्ट परंपरा तसेच क्रिडा व इतर क्षेत्रात त्यांच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवून शैक्षणिक संस्थेचे नाव उज्वल करण्यात आघाडी घेतली आहे.

स्कूलच्या या यशाची परंपरा अबाधित रहावी यासाठी संस्थेचे प्राचार्य, गुणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे काम आकाशाला गवसणी घालणारे आहे. अशा शब्दात  सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांनी संस्थेचा गौरव केला.

     पद्मभूषण डॉ.विखे पाटील सीबीएसई स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण व त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी आयोजित आस्था २०२३ उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल, विकास पावरा, आदींच्या हस्ते दीपप्रज्वल करून करण्यात आला. यावेळी बागुल बोलत होते.

       संस्थेच्या प्राचार्य सौ.वर्षा दारकुंडे यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेवून शैक्षणिक वर्षातील गुणवंत मुलांच्या यशाची माहिती दिली. यावेळी संस्थेत सलग १० वर्ष सेवा संपन्न झालेल्या प्राचार्या सौ.दारकुंडे यांच्यासह विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यालयातील चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य नाटिका, गायन वादन, यातून सुमधुर व नेत्रदीपक, कलाविष्कार सादर करून उपस्थितांना मंत्र मुग्ध केले.

यावेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती विदुल परांजपे, आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ.भागवत शिंदे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.निर्मल पवार, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओंकार रसाळ, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश भालसिंग, शेवगाव इंग्लिश मेडियम स्कूलचे प्राचार्य शशिकांत प्रधान, आदींसह विद्यालयातील शिक्षक, नागरिक, पालक यांची उपस्थिती होती. शिक्षक अभिजित हासे यांनी कार्यक्रमाचे तर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ काळे, सृष्टी नाईक, रुचा चेके, सुमित अभंग यांनी केले. भाऊसाहेब गायधने यांनी आभार मानले.