शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बहुमताने आले असून वर देशातही महायुतीच असल्याने शेतकऱ्याचे सरसकट सर्व कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा. याचे स्मरण करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक काळात देण्यात आलेलीआश्वासने संबंधित पक्षाच्या सरकारने पाळायला हवीत. शेतकऱ्यांवर सातत्याने आसमानी व सुलतानी संकटे ओढवत असतात .त्यातून मार्ग काढताना तो मेटाकुटीला येत असतो. याच नैराश्येतून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.

आज ना उद्या आपले कर्ज माफ होईल या आशेवर शेतकरी दिवस ढकलत आहेत. अशातच अनेक बँक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांकडे कर्जडीचे तागादे लावले आहेत. ते अनेकदा शेतकऱ्यांना धमकावत असून कारवाई करण्याची त्यांची भाषा शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे.

सध्या कोणताच शेतकरी बँकेचे कर्ज भरू शकण्याच्या स्थितीत नाही.”शेतकरी जगला तर देश जगेल, म्हणून तसेच आपल्या आश्वासनाची देखील पूर्ती म्हणून सरसकट सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती निवेदनात शेवटी करण्यात आली आहे.
