साईबाबांच्या शिर्डीत पार पडला अश्वांचा रिंगण सोहळा

शिर्डी प्रतिनिधी, दि. ६ : पंढरपूरच्या आषाडी वारीतील माऊलीच्या पालखी सोहळ्यातील अश्वांचा रिंगण सोहळा आता साईबाबांच्या शिर्डी नगरीत पार पडला असून यापुढेही दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात “याची देह याची डोळा” असा हा दैदीप्यमान सोहळा पार पडणार असल्याची माहिती ग्रीन एन क्लिन शिर्डी  फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान सातारा जिल्ह्यातील कोरेगाव ते शिर्डी या पायी पालखी बरोबर 500 पदयात्रीचे आगमन बुधवारी सकाळी आओ साई खंडोबा मंदिर येथे झाले. साई माऊली पालखीच्या स्वागतासाठी नगर मनमाड महामार्गांवर सडा, रांगोळी काढून करण्यात आले. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, महंत काशीकानंदगिरी महाराज, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतिष दिघे, साईभक्त कमलाकर कोते, साई निर्माण उद्योग समूहाचे विजय कोते, ग्रीन एन क्लिन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख, जितेंद्र शेळके, मनिलाल पटेल, ताराचंद कोते, आओ साई म्हाळसापती ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नागरे, अजय नागरे, प्रा.तिडके आदीसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या आषाढी पंढरपूर वारीतील पालखीला जुपणारी बैल जोडी आणी रिंगण सोहळ्यातील मानाची अश्व जोडी शिर्डीत दाखल होताच त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. साई माऊली पालखी सोहळ्याचे यंदा चौदावे वर्ष आहे. दहा दिवस यायला आणी दहा दिवस जायला असा वीस दिवस हा पालखी सोहळा असतो.

या साईमाऊली पालखी रथास प्रथमच माउलींच्या पालखीची बैल जोडी जुपल्याने माऊली भक्त आणी साईभक्तांच्या डोळयांची पारणें फिटली. तर आषाढी वारीतील मानाचा अश्व रिंगण सोहळा श्री साईबाबांच्या शिर्डीत प्रथमच पार पडल्याने हा दैदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी नगर-मनमाड महामार्गांवर शिर्डी ग्रामस्थांसह साई भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यापुढे दरवर्षी साई परिक्रमा दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 12 फेब्रुवारीला हा रिंगण सोहळा सुरु असणार आहे. पुढील वर्षी या रिंगण सोहळ्यासाठी मोठे मैदान उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी दिली.

Leave a Reply