पढेगावच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या संगिता मापारी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७:  कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पढेगाव  ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या संगीता नानासाहेब मापारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

पढेगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच मुक्ता बर्डे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. उपसरपंच पदाच्या रिक्त असलेल्या जागेवर नियमाप्रमाणे निवडणूक घेण्यात आली. याप्रसंगी परजणे गटाच्या प्रियंका कर्पे आणि काळे गटाच्या संगीता मापारी यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशीत पत्र दाखल केले होते.

या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य उषा तरटे आणि सुवर्णा म्हस्के यांनी काळे गटाच्या संगीता मापारी यांना पाठिंबा दिला व सरपंच मीना शिंदे यांनी संगीता मापारी यांच्या बाजूने आपले निर्णायक मत नोंदविल्यामुळे संगीता मापारी यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी उपसरपंच संगीता मापारी यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.        

यावेळी सरपंच मीना शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मापारी, उषा तरटे, प्रियंका कर्पे, दत्तु मापारी, बाबासाहेब आहेर, लक्ष्मण शिंदे, केशव शिंदे, बाबासाहेब शिंदे, मनीषा साळवे, सुवर्णा म्हस्के, मुक्ता बर्डे आदी सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक बाबासाहेब गुंड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन कामकाज पाहिले त्यांना ग्रामपंचायत कर्मचारी शरद लाड, नारायण शिंदे यांनी सहकार्य केले.