कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : नाट्य कलाकार व नाट्य रसिक खुले नाट्यगृह सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत असून तसेच उदयोन्मुख खेळाडूंना सराव करण्यासाठी क्रीडा संकुल उपलब्ध नसल्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे. त्यासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाच्या कामाला गती द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा जाणून घेतला. यावेळी या बैठकीसाठी तहसीलदार महेश सावंत, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप, सार्वजनिक बांधकाम अभियंता वर्षराज शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी कोंढवणे, नगर रचनाकार अश्विनी पिंगळ, पद्माकांत कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, अरुण चंद्रे, प्रशांत वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की, कोपरगाव शहराच्या विकासाबरोबरच कोपरगाव शहरातील नाट्य रसिकांना खुले नाट्यगृह व युवा खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल उभारायचे आहे. त्यासाठी हे काम लवकरात कसे पूर्ण होईल यासाठी सबंधित अधिकाऱ्यांनी कामाचा वेग वाढवावा व कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाची निर्मिती करावी. त्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील. खुले नाट्यगृहासाठी दोन कोटी निधी दिला असून अजूनही निधीची गरज भासल्यास निधी मिळवून देईल अशी ग्वाही दिली व लवकरात लवकर नाट्यगृह उभे राहावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

कोपरगावमध्ये अनेक प्रतिभावंत कलाकार आहेत. खुल्या नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य प्रदर्शन, संगीत संमेलने आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी व प्रत्येक कलाकाराच्या कलेला वाव मिळवणारे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे. नागरिकांना कला आणि संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक उन्नतीला चालना मिळून स्थानिक कलाकारांना आणि शालेय विद्यार्थ्यांना आपले कौशल्य प्रकट करण्यासाठी एक मंच मिळणार आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून प्रतिभावंत कलाकार निश्चितपणे कोपरगावचे नाव उज्वल करतील.

त्याप्रमाणेच अत्याधुनिक सुविधा असलेलं क्रीडा संकुल विविध क्रीडाप्रकारांसाठी स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू घडणार आहेत. तरुणांना क्रीडा प्रकाराबाबत योग्य प्रशिक्षण शहराच्या क्रीडाशक्तीला प्रोत्साहन देवून स्थानिक खेळाडूंना प्रगतीच्या अधिक संधी प्राप्त होणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक उन्नतीला चालना देण्यासाठी व उदयोन्मुख खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून कामाला गती द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
