कोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील डॉ. गायत्री राजेश परजणे हिला पुणे येथील श्रीमती काशिबाई नवले मेडीकल कॉलेज ॲन्ड जनरल हॉस्पीटलच्यावतीने आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स अंतर्गत एमडी ॲनेस्थेसियोलॉजी ॲन्ड क्रिटीकल केअर (भूल व अतिदक्षता तज्ज्ञ) या पदवीने पुणे येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.

गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे संस्थापक, दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांची गायत्री ही नात असून पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील यांची पुतणी व संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांची कन्या आहे. संवत्सर कोपरगांवात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर गायत्री हिने पुढील माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा गर्लस् इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले.

त्यानंतर एम. बी. बी. एस. चे शिक्षण अहिल्यानगर येथील विळद घाटातील डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केल्यानंतर मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर डॉ. अभिजीत दिवटे यांच्या मार्गदर्शनाने व शासनाच्या फेरी प्रवेशातून पुणे येथील श्रीमती काशिबाई नवले मेडीकल कॉलेज ॲन्ड जनरल हॉस्पीटलमध्ये गायत्रीला प्रवेश मिळाला.

तेथे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स अंतर्गत एमडी ॲनेस्थेसियोलॉजी ॲन्ड क्रिटीकल केअर विभागात तिने पदविका शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. प्राथमिक शिक्षणापासून ते पदविका शिक्षणापर्यंतचा तिचा प्रवास लक्षणीय राहिला. प्रत्येक वर्गात विशेष प्राविण्य मिळविणारी गुणवान विद्यार्थिनी म्हणून गायत्रीने आपली ओळख निर्माण केली.

पुण्याच्या श्रीमती काशिबाई नवले मेडीकल कॉलेज ॲन्ड जनरल हॉस्पीटलच्यावतीने आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स अंतर्गत शिक्षणातला आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्ल एमडी ॲनेस्थेसियोलॉजी ॲन्ड क्रिटीकल केअर (भूल व अतिदक्षता तज्ज्ञ) या पदवीने पुणे येथे एका भव्य समारंभात गायत्री हिचा सन्मान करण्यात येऊन तिला डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.

डॉ. गायत्री परजणे हिच्या यशाबल राज्याचे जलसंदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त व सचिव डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, डॉ. अभिजीत दिवटे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.
