शेवगाव प्रतिनीधी, दि. १९ : शिक्षक व लोकसहभागातून साकारलेल्या उमेद वाचनालयास लेखक दिलीप शिंदे व त्यांचा मित्रपरिवार यांनी शुक्रवारी ( दि. १८ ) रोजी भेट दिली. या वेळी त्यांनी लिहलेली पुस्तके उमेद वाचनालया साठी उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांच्याकडे प्रदान केली.

लेखक शिंदे यांची स्वलिखित मला शिकायचंय व घात ही अलिकडच्या काळात गाजलेल्या पुस्तकांसह अनेक पुस्तके उमेद वाचनालयास भेट दिली. उमेद वाचनालयाचे शिलेदार विष्णू वाघमारे यांचे ते मित्र आहेत. उमेद वाचनालयाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद व वाचन संस्कृती वाढवण्यासाठी डॉ. गाडेकर यांनी सुरू केलेल्या या वाचनालयाची पाहणी करण्यासाठी शिंदे व त्यांच्या मित्रमंडळानी ही भेट दिली.

शिंदे यांचे मित्रमंडळ अशोक लांडगे, गणेश बोरूडे, ज्ञानेश्वर खंडागळे, आनंद घोडके या वेळी उपस्थित होते. या पाहुण्यांचा स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक भेट देऊनच सन्मान केला. सूत्रसंचालन विष्णू वाघमारे यांनी केले, तर अमोल कांबळे यांनी आभार मानले.

वाचता येणा-या प्रत्येकांनी वाचत जावे. रोज पुस्तकाची किमान चार पाने तरी वाचावीत. वेळ मिळाल्यास वाचनासाठी खर्च करावा. वाचन हा मनाचा व्यायाम आहे. वाचनाने व्यक्तीचे मन प्रगल्भ व संयमी होते. – डॉ. शंकर गाडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी
