शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : महावितरण कंपनीने ऑनलाइन पद्धतीने विज बिल वेळेत भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी बक्षीस योजना कार्यान्वित केली आहे. महावितरणच्या उपविभागीय कार्यालय स्तरावर या ग्राहकातून सोडत पद्धतीने पाच भाग्यवान ग्राहकांची निवड करून त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने विज बिल भरणा करणे सोपे झाले आहे. क्यू आर कोड स्कॅन करून विज बिल भरता येणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शेवगाव उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता मनोज पुरोहित यांनी केले आहे.

ग्राहकांना बँकेत किंवा वीज बिल भरणा केंद्रामध्ये जाण्याचा त्रास आणि वेळेची बचत होते. महावितरण कंपनीने पेपरलेस बिल म्हणून आणखी दहा रुपये सूट दिली आहे. महावितरणच्या सर्व उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ऑनलाइन पद्धतीने विज बिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना दरमहा सोडती द्वारे बक्षीस दिले जात आहे. मार्च २०२५ ची बिले ज्या ग्राहकांनी ऑनलाईन भरली त्या ग्राहकांच्या नावातून सोडत काढण्यात आली.

यावेळी महावितरण कंपनीच्या शेवगाव येथील उपविभागीय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता पुरोहित, कनिष्ठ अभियंता विश्वास नरके सहाय्यक लेखापाल सुरेश जायभाये, वरिष्ठ लिपिक राहुल जुने, वायरमन भाऊसाहेब दराडे यांच्या हस्ते पारितोषिक विजेत्या ग्राहकांचा सन्मान करण्यात आला अनिल गीते बोधेगाव, निसार पठाण – दहिफळ व सत्यभामा आसाराम गाढवे – बोधेगाव या तिघांना सॅमसंग मोबाईल तसेच गंगुबाई भानुदास पवार रा. लाडजळगाव व देवराव सर्जेराव धावणे – मुर्शिदपूर या दोघांना रिस्ट वॉच पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
