कोपरगावात रंगणार खुल्या बुद्धिबळ स्पर्धा

आयोजनाचं चौथ वर्ष, ४ गट, ६४ रोख बक्षिसं, १३२ चषक

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ :  रणनीती आणि चातुर्य यांचा मिलाफ असणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेची रंगत कोपरगावकरांना याचि देहि याचि डोळा अनुभवता येणार आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठाण आणि कोपरगाव चेस-स्पोर्ट क्लबच्या संयुक्त विद्यमाने युवानेते विवेक कोल्हे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

येत्या २ ऑगस्ट (शनिवार) आणि ३ ऑगस्ट (रविवार) रोजी चार गटांत स्पर्धा पार पडेल. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. विवेक कोल्हे (चेअरमन, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगाव) यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन संपन्न होईल. 

अहमदनगर डिस्ट्रिक्ट चेस सर्कलच्या मान्यतेनं पार पडणाऱ्या स्पर्धेचं यंदाचं चौथं वर्ष आहे. संत जनार्दन स्वामी आश्रम (भक्तनिवास क्र. २) पुणतांबा फाटा येथे स्पर्धा पार पडतील. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने स्पर्धकांनी विहित वेळेत नोंदणी करण्याचं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. स्विसलिग पद्धतीने फिडेच्या नियमानुसार स्पर्धा पार पडणार आहेत.

सागर गांधी (सोलापूर) आर्बिटर म्हणून काम पाहणार आहेत. ११, १४, १९ वर्षाखालील आणि खुला अशा चार गटांत स्पर्धा होतील. स्पर्धेतील विजेत्यांना जिल्ह्यानिहाय, तालुकानिहाय तसेच मुलींसाठी स्वतंत्र अशी एकूण ६४ रोख आणि १३२ चषक असं भरगच्च बक्षिसांचं स्वरुप असणार आहे. 

“व्यक्तिगत तसेच मानसिक विकासासाठी बुद्धिबळाचं महत्व अनन्यसाधारण आहे. प्राचीन वारसा लाभलेल्या बुद्धिबळाला आधुनिकतेचा स्पर्श लाभला आहे. कोपरगावातील बुद्धिबळ प्रेमींनी एकत्रित येऊन स्पर्धेचा पाया रचला. ग्रामीण भागातील खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध व्हावं आणि खेळाडू घडावे हा आमचा मानस आहे.” अशी भावना विवेक कोल्हे यांची आहे.

“गेल्या चार वर्षांपासून बुद्धिबळ स्पर्धेला युवानेते विवेक कोल्हे यांचे सर्वोपतरी पाठबळ लाभत आहे. त्यामुळे स्पर्धेला अधिक सुनियोजित स्वरुप प्राप्त झालं आहे. वर्षागणिक सहभागींची वाढती संख्या हे स्पर्धेच्या यशाचं द्योतक आहे. बाहेरगावावरुन येणाऱ्या स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था स्पर्धास्थळी करण्यात आली आहे.” अशी माहिती नितीन सोळके संस्थापक – कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लब यांनी दिली आहे.

स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये-  1. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेचे परीक्षण 2. आंतर-जिल्ह्यानिहाय (अ.नगर, नाशिक, छ.संभाजीनगर) स्वतंत्र बक्षिसे 3. आंतर-तालुकानिहाय (येवला, वैजापूर, राहाता, संगमनेर,श्रीरामपूर) स्वतंत्र बक्षिसे 4. चारही गटनिहाय मुलींसाठी स्वतंत्र बक्षिसे 5. चारही गटनिहाय कोपरगाव तालुक्यासाठी स्वतंत्र बक्षिसे

Leave a Reply