शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे व कोल्हे गटाचे राजेंद्र गीते राष्ट्रवादीत

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाचा केलेला विकास इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांना देखील भावला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांचे देखील राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षात जोरात इनकमिंग सुरु आहे. हि इनकमिंग नियमितपणे सुरूच असून आ.आशुतोष काळेंच्या वाढदिवशी कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेच्या (उबाठा गट) तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे यांनी आपल्या पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

मागील पाच वर्षात आ.आशुतोष काळे यांनी केलेला विकास नजरेत भरणारा असून सर्वसामान्य जनतेपर्यंत विकास पोहोचला आहे. सध्या कोणत्याही प्रकारचा निवडणूक माहोल नाही परंतु जनतेचे हित जोपासणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांची व नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरु आहे.

सोमवार (दि.०४) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादीत पुन्हा एक प्रवेश सोहळा पार पडला असून शिवसेनेचे तालुकाध्यक्ष (उबाठा गट) शिवाजी ठाकरे व कोल्हे गटाचे जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र गीते यांनी कोल्हे गटाला सोडचिट्ठी देत हाती घड्याळ घेतले आहे.

त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सातत्याने प्रवेश करीत असल्यामुळे कोपरगाव मतदार संघात आ. आशुतोष काळे यांची ताकद वाढतच चालली आहे. त्याचा फायदा भविष्यात होवू घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काळे गटाला होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.