कोपरगाव जिल्हा होण्यापासून दूरच, जिल्हा विभाजनाच्या यादीत शिर्डी अग्रभागी 

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५: एकेकाळी  जिल्ह्याचा दर्जा असलेला कोपरगाव तालुका राजकीय कुरघोडीत विभागला गेला. हळूहळू कोपरगाव तालुक्यातील महत्वाच्या गावांना तालुक्याचा दर्जा मिळाला. बघताबघता  त्या तालुक्यांना जिल्ह्याचा दर्जा मिळतोय. अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार असल्याने उत्तरनगर जिल्ह्यातील शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्यांची नावे  चर्चेत आहेत त्यातही शिर्डी जिल्ह्याचे ठिकाण होणार हे आता लपून राहीले नाही.

माञ एकेकाळचा बलाढ्य तालुका म्हणून कोपरगावची ख्याती होती. ज्या तालुक्यात ७ साखर कारखाने, साखरे बरोबर गुळाची मोठी बाजार पेठे, व्यवसायिक शेती बरोबर इतर  व्यवसाय, उद्योग, व्यापाराने तालुक्याची भरभराट होती. समृध्द असलेला  हा कोपरगाव तालुका, पुर्वीचा लोकसभा मतदार संघ होता. कोपरगाव मतदार संघात निवडून आलेल्या प्रत्येक प्रतिनिधीला राज्यासह देशात विशेष महत्त्व होते. 

सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेला हा तालुका भविष्यात जिल्ह्याचे ठिकाण होणार हे निश्चित होते. पण काळानुसार राजकीय बदल होत गेले. तालुक्याचे विभाजन झाले. श्रीरामपूर, राहता वेगळा तालुका झाला. राजकीय तुल्यबळ नेत्यांनी काळे-कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्षाचा वेळोवेळी फायदा उचलून आपल्याच तालुक्याला कसा दर्जा मिळवता येतो यावर भर दिला. काळे-कोल्हे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या समोर नेतेगिरी करण्यात धन्यता मानीत विरोधाला विरोध करीत बसले.

शेजारच्या तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण बाजुला ठेवून प्रसंगी एकसंघ होतात. माञ कोपरगावचे कार्यकर्ते उलट नेत्यांना सांगुन विरोध करण्यास भाग पाडतात. काही वेळा विरोध होणार असल्याने विकास कामाला अडथळा येतो. म्हणुनच आज कोपरगाव जिल्हा विभाजणाच्या शर्यतीपासुन दूर आहे. कोपरगाव तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आहे. अनेक महत्वाच्या रेल्वे थांबणारं मोठं रेल्वेस्टेशन आहे. तालुक्यातून समृध्दी महामार्गाचं  सर्कल आहे. स्मार्ट सिटी तयार होत आहे. कोपरगाव दळवळणासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे.

शैक्षणिक क्षेत्रात कोपरगाव राज्यात अव्वल स्थानावर आहे. दोन सहकारी साखर कारखाने आहेत. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचं समाधीस्थळ, आत्मा मालीक माऊलींचे आश्रम, संजीवनी विद्या प्राप्त शुक्राचार्य  यांचे एकमेव मंदीर येथे आहे. रामायण महाभारताच्या खानाखुणा सांगणारा अध्यात्मिक वारसा लाभलेला हा ऐतिहासिक तालुक गोदावरी नदीच्या प्रवाह, ज्या तालुक्याला एकेकाळी रघुनाथराव पेशवे यांनी राज्याची राजधानी करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. अशा कोपरगाव तालुक्याला आता जिल्ह्याचा दर्जा मिळण्याच्या आशा मावळल्या सारखे चिञ झाले असुन कोपरगाव जिल्हा होण्यापासुन दूर गेला आणि  कोपरगावच्या जवळ जिल्हा आला असं म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.

 एका बाजुला श्रीरामपूर, संगमनेर तालुक्यातील नेते कार्यकर्ते आपल्याच तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा मिळावा म्हणून  शेवटच्या क्षणापर्यंत  लढण्यासाठी  वज्रमूठ बांधली आहे. तर  राहता, शिर्डीकरांनी  जिल्हा होणार म्हणून फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंद व्यक्त केला. शिंदे फडवणीस सरकारने महसुल मंञी  राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला वाढदिवसाची अनोखीभेट म्हणून  मंञीमंडळाच्या बैठकीत  शिर्डीला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाची मंजुरी देण्यात आली. संबंधीत कार्यालयाला अधिकारी व कर्मचारी भरतीचे आदेशही काढल्याने आता शिर्डी जिल्ह्याचे ठिकाण झाल्यासारखेच आहे. यासाठी महसुल मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांचा आग्र अधिक होता.

 दरम्यान कोपरगाव तालुक्याचे दिवंगत नेते माजी खासदार शंकरराव काळे  व माजी मंञी  शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्याच्या विस्तारासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. पाटपाण्याचा प्रश्न असो किंवा इतर विकासाचा प्रश्न या दोन्ही नेत्यांना वरिष्ठ पातळीवर संघर्ष केल्याशिवाय सहज काहीच मिळाले नाही. म्हणुनच तालुक्याच्या विकासाची गंगा काही प्रमाणात मंदावत गेली. माञ शेजारच्या तालुक्यातील नेत्यांना त्यांना हवं ते वरिष्ठांनी भरभरुन दिले. पाठीमागून निर्माण झालेल्या तालुक्यांना दररोज पिण्यासाठी पाणी मिळते, पण आजही कोपरगावच्या नेत्यांसह नागरीकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

वरिष्ठ पातळीवरुन कोपरगाव तालुक्याला पडद्यामागून कोण डावलतय? कोणाच्या मनात कोपरगावच्या नेत्या बद्दल व नागरीकां बद्दल आकस आहे का? जिल्ह्याचे ठिकाण असलेला कोपरगाव तालुका अचानक मागे का पडतोय? तालुक्यातील दोन्ही मातब्बर नेते जिल्हा विभाजनासह इतर म्हत्वाच्या विकास मुद्द्यावर एकञ का येत नाहीत?लुडबुड करणारे कार्यकर्ते विकासाच्या मुद्द्यावर एकमेकाविरोधात दंड थोपटून का उभारतात.  वैयक्तीक मैञी, नाते गोते सांभाळतात. तिथे एकञ येतात मग तालुक्यातील महत्वाच्या प्रश्नावर नेत्यांसह कार्यकर्ते का एकञ येवून वरिष्ठ पातळीवर दुजाभाव करणाऱ्यांना धारेवर धरत नाहीत? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घोळत आहेत. 

कोपरगाव तालुक्याची हिच स्थिती कायम राहिली तर भविष्यात कोपरगाव तालुक्याचे नाव राहील की तिथेही विभाजन होवून येत्या काळात राहता शिर्डी, कोपरगाव महानगरपालिका होईल. असे  झाले तर कोणी आश्चर्य व्यक्त करु नये.

आंतरराष्ट्रीय विमानतळ कोपरगांव तालुक्यात असताना विमानतळाला नाव  शिर्डी विमानतळ शिर्डीच्या साईबाबा बद्दल कोपरगावकरांची प्रचंड श्रद्धा आहे. म्हणून की काय शिर्डी नावाला कोणाचा विरोध होणार नाही हा हेतू ठेवून कोपरगावचे नाव हळू हळू कमी तर केले जात नाही ना? काहीही झाले तरी कोपरगावचे नाव सध्यातरी जिल्हा विभाजणाच्या यादीत नसल्यासारखेच आहे.

 समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते नुकतेच झाले या कार्यक्रमाच्या वेळी महसुली मंञी राधाकृष्ण विखे पाटील यांना परिसरातील विकासाबद्दल विचारले असता ते म्हणाले होते, येत्या काळात शिर्डी राहता तालुक्याच्या विकासाला चालना देण्याबरोबर राहता, शिर्डी व कोपरगाव हे जवळजवळ एकच झाले आहे. तेव्हा लवकरच महानगरपालीका करण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले. यावरून कोपरगाव येत्या काळात शिर्डी- राहत्यात विलीन होणार असे विखे यांच्या बोलण्यातून वाटते?

loksanvad Avatar