कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : गाळप हंगाम २०२४-२५ च्या गळीतास आलेल्या ऊसाला पहिले पेमेंट रु.२८००/- प्र.मे.टन याप्रमाणे अदा केले असून शेतक-यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन जून महिन्यात रु. १५०/- प्र.मे.टन प्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे. यामध्ये कार्यक्षेत्र व गेटकेन असा कोणताही भेदभाव न करता सर्व ऊस उत्पादकांना समान दर दिला आहे. कर्मवीर शंकररावजी काळे तसेच कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच शाश्वत ऊस दर व तोही वेळेत अदा करण्याची परंपरा यापुढे देखील अविरतपणे सुरु ठेवून गळीत हंगाम २०२४-२५ चा तिसरा व अंतिम हफ्ता रु. १५०/- प्र.मे.टन प्रमाणे देवून दसऱ्या नंतर सदरची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी जाहीर घोषणा आ.आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. त्यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम सर्वाधिक रुपये ३१००/- दर देणारा व ठिबक सिंचनावर उत्पादित केलेल्या ऊसास रु.१००/- प्र.मे.टन अनुदान देवून रुपये ३२००/- दर देणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना एकमेव ठरला आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहून, पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक भान यांच्या जोरावर सहकारी साखर कारखानदारीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची ७२ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली.या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षीय पदाची सूचना डॉ.चंद्रशेखर आव्हाड यांनी मांडली सदर सूचनेस श्रीकांत तीरसे यांनी अनुमोदन दिले. कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले.

आपल्या भाषणात पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याच्या व्यवस्थेचा मुख्य कणा आहे आणि त्याच्या घामाला योग्य न्याय मिळालाच पाहिजे. या उद्देशातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा ध्यास घेतलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनात पारदर्शकता ठेवून शेतकऱ्यांच्या ऊसाला वेळेवर आणि योग्य दर दिला. हि परंपरा आजतागयात सुरु असून त्यावेळी आणि आजही आपल्या कारखान्याचा केंद्रबिंदू हा ऊस उत्पादक शेतकरीच राहिला आहे. कर्मवीर शंकररावजी काळे यांची हीच दूरदृष्टी आणि विचारांची ताकद घेवून आपले मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारखान्याच्या आर्थिक उन्नतीचा पाया भक्कम करीत आहोत. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात कारखान्यास निव्वळ नफा रु. ३.७८ कोटी झालेला असून संचालक मंडळाने केलेल्या आर्थिक कामकाजास लेखापरिक्षकांनी ऑडिट वर्ग “अ” दिलेला देवून ऑडिट वर्ग “अ” मिळाला आहे.

केंद्र शासनाने साखरेचा किमान विक्री दर (एम.एस.पी.) रु.३१००/- प्रति क्विंटल माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहिर केलेला होता. सहा वर्षाचा कालावधी होवूनही साखरेच्या एम.एस.पी.मध्ये वाढ झालेली नाही. एकीकडे रॉ मटेरियल म्हणजे ऊसाच्या एफ.आर.पी. मध्ये वाढ होत असतांना साखरेच्या किंमतीत मात्र वाढ केली जात नाही. साखर उदयोगामध्ये अशा प्रकारची अनिश्चितता आहे त्यामुळे अशा प्रकारच्या दरवाढी हया स्वयंचलित झाल्या पाहिजे असे मत व्यक्त करून काळानुरुप साखरेच्या एम.एस.पी. मध्ये वाढ करणे आवश्यक असून त्याबाबत साखर उद्योगाने मा. केंद्र सरकारला वेळोवेळी विनंती केलेली असल्याचे त्यांनी सांगितले. सहकारी चळवळीने ग्रामीण भागात आर्थिक, समाजिक व राजकीय परिवर्तन केले. महाराष्ट्राकडे सहकारी चळवळीतील देशात आग्रेसर राज्य म्हणून पाहिले जाते. त्यामुळे केंद्र शासनाने सहकारी चळवळीचे महत्व लक्षात घेऊन एक वर्षापुर्वी नव्याने केंद्रात सहकार खाते निर्माण केले त्याबद्दल केंद्र शासनाचे त्यांनी आभार मानले.

कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सिंचनासाठी येणारी पाण्याची कमतरता लक्षात घेवून ऊस पिकास ठिबक सिंचनाचा वापर वाढविल्यास कमी पाण्यात ऊसाचे उत्पादन घेता येते. त्यासाठी मागील गळीत हंगामा प्रमाणे चालु गळीत हंगाम २०२५-२६ करीता देखील ठिबक सिंचनाचे धोरण घेण्यात आले असून याही वर्षी प्र.मे.टन रु.१००/- ठिबक सिंचनाकरीता प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना कार्यक्षेत्रात विक्रमी ऊस उत्पादन घेण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी विक्रमी ऊस उत्पादन प्रोत्साहनपर बक्षिस योजना जाहीर केली.

यामध्ये जे ऊस उत्पादक शेतकरी प्रती एकरी हे १०१ मे. टनाच्या पुढे उत्पादन घेतील त्यांना रक्कम रु.७१,०००/-, ९१ ते १०० मे. टनाचे पुढे ऊस उत्पादन घेणा-यास रक्कम रु.५१,०००/-, ८१ ते ९० मे.टन ऊस उत्पादन घेणा-यास रक्कम रु.३१,०००/- व ७५ ते ८० मे.टन एकरी ऊस उत्पादन घेणा-यास रक्कम रु. २५,०००/- या प्रमाणे बक्षिस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. व हि योजना ही गाळप हंगाम सन २०२५-२६ व गाळप हंगाम सन २०२६-२७ या दोन वर्षाकरीता घेण्यात आलेली असून शेतक-यांनी जास्तीत जास्त एकरी ऊस उत्पादन घेवून बक्षिसांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये आडसाली-व्यंकटेश प्रतापराव बारहाते, संवत्सर, पूर्व हंगामी-सौ.केशरबाई भाऊसाहेब जाधव,शहा, सुरु-बाळासाहेब ठकाजी खळदकर, वारेगाव, खोडवा-राजेंद्र साहेबराव माळवदे, धोत्रे या ऊस उत्पादक शेतक-यांचा समावेश होता. सभेचे सूत्रसंचालन माजी अरुण चंद्रे यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी केले. यावेळी विषय पत्रिकेवरील १ ते ११ विषय सर्व सभासदांकडून टाळ्यांच्या गजरात वर हात करून एकमताने मंजूर करण्यात आले. सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे यांनी मानले.

याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, तसेच माजी संचालक बाळासाहेब कदम, ज्ञानदेव मांजरे, विश्वासराव आहेर,पद्माकांत कुदळे, चंद्रशेखर कुलकर्णी, कारभारी आगवण,नारायण मांजरे, बाबासाहेब कोते, एम.टी. रोहमारे, राजेंद्र गिरमे, मुरलीधर थोरात, मुरलीधर शेळके, सोमनाथ चांदगुडे, सोमनाथ घुमरे, सुनील शिंदे, संभाजीराव काळे,परसराम थोरात, अॅड. शंतनू धोर्डे, धरमचंद बागरेचा, बाळासाहेब जपे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगर, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन,संचालक,पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे माजी सभापती, उपसभापती,सदस्य,नगरपालिकेचे सदस्य,कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि.सेक्रेटरी संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवार रस्त्यापासून ते राज्य मार्ग ०७, ७५२ जी राष्ट्रीय महामार्गा पर्यंत, छोट्या मोठ्या पाणी योजनांपासून ते मंजूर बंधारा, ५ नंबर साठवण तलावापर्यंत, ट्रान्सफॉर्मर पासून ते सबस्टेशन पर्यंत, प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालया पर्यंत, उजनी चारी पासून ते निळवंडे व गोदावरी कालव्याच्या आवर्तन शेतकऱ्यांना वेळेवर कसे मिळतील यासाठी केलेला पाठपुरावा व झालेल्या विकास कामांच्या जोरावर व जनतेच्या भरभक्कम पाठींब्यावर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आलो. त्यामुळे माझ्याबरोबरच तुमची जबाबदारी पण वाढली आहे. कोपरगाव मतदार संघ विकासाच्या बाबतीत पुढे घेवून जायचा आहे आजपर्यंत विकास कामांच्या बाबतीत पाठपुरावा करण्यात कुठे कमी पडलो नाही आणि भविष्यात पण पडणार नाही. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीबाबत काही लोक उपकाराची भाषा बोलायला लागले आहेत. त्यांना बोलायला दुसरे काही नाही त्यांना पण कार्यकर्ते चार्जिंग ठेवावे लागत आहे हे मी समजू शकतो. मात्र वारंवार अशी वक्तव्य आल्यास मार्केट कमिटीची निवडणूक असेल, शिक्षक मतदार संघाची निवडणूक असेल किंवा लोक सभेची निवडणूक असेल या सर्व निवडणुकींचे विश्लेषण करून त्यांचा तो गोड गैरसमज दूर करण्यास मी भक्कम आहे असा टोला आ.आशुतोष काळे यांनी पारंपरिक विरोधक कोल्हे यांचे नाव न घेता लगावला. आपण त्यांना उत्तर देवू परंतु उत्तर देण्याची हि वेळ नाही येणाऱ्या निवडणुकांना आपल्या सर्वाना पुन्हा ताकदीने व पूर्ण क्षमतेने सामोरे जायचे आहे आणि विजयश्री खेचून आणायची आहे त्यासाठी कामाला लागा-आ.आशुतोष काळे.
