कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव तालुक्यासह कोपरगाव शहराच्या विजेच्या अडचणी सोडविण्यासाठी कोपरगाव सबस्टेशनवरचा भार कमी करण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. आता त्यापुढे जावून कोपरगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याबाबत नुकतीच त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीत कोपरगाव शहरात महावितरणचे स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्याच्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी मा.आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोळपेवाडी येथे १३२ के.व्ही.ए.चे सबस्टेशन मंजूर करून आणले होते परंतु २०१४ नंतर हे सबस्टेशन शहा येथे घालवीण्यात आले. मात्र त्यावरचा कोपरगाव तालुक्याचा हक्क आ.आशुतोष काळे यांनी अबाधित ठेवून मागील वर्षी हे सबस्टेशन कार्यान्वित होताच तालुक्यातील कोळपेवाडी, चासनळी हे सबस्टेशन शहा सबस्टेशनला अग्रहक्काने जोडून घेतले असून पोहेगाव सबस्टेशन जोडण्याचे काम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे कोपरगाव सबस्टेशनचा भार हलका होवून कोपरगाव शहर व इतर सबस्टेशनवरील वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत आहे.

यामध्ये अधिकची सुसूत्रता आणून कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कोपरगाव शहरात महावितरणचे नवीन विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) उभारून त्या ठिकाणी १० एमव्हीए क्षमतेचे ४ ट्रान्सफॉर्मर बसविल्यास विजेच्या समस्या कमी करण्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी आपली संकल्पना मांडली.

यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी आ.आशुतोष काळेंच्या निर्णयाचे स्वागत केले. नवीन सबस्टेशनच्या उभारणीचा निर्णय अतिशय योग्य आहे. त्यामुळे विजेच्या समस्या संपुष्टात येणार असून वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होण्यास निश्चितपणे मदत होईल त्यासाठी कोपरगाव शहरात जागा उपलब्ध होणे गरजेचे सांगितले.

त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेवून नवीन उपकेंद्रासाठी आवश्यक असणारी जागा लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. या बैठकीसाठी महावितरणचे अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता धनंजय धांडे, सहाय्यक अभियंता अतुल खंदारे, दिनेश पंडोरे, पंकज मेहता, संतोष धारराव आदी उपस्थित होते.

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळपेवाडीव व चासनळी सबस्टेशन १३२ के.व्ही.ए.च्या शहा सबस्टेशनला जोडले आहेत. त्यामुळे कोपरगाव शहराच्या सबस्टेशनवरचा भार तर कमी झालाच परंतु कोळपेवाडीव व चासनळी सबस्टेशनच्या वीज ग्राहकांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत झाली. याची नुकतीच प्रचीती आली असून शनिवार(दि.२७) रोजी सायंकाळी सहा पासून सलग अठरा तास पाऊस कोसळत असतांना व सोसाट्याचा वारा वाहत असतांना देखील कोळपेवाडी व चास नळी सबस्टेशन वरील वीज ग्राहकांना अखंडीतपणे वीज पुरवठा सुरु होता. जर हे सबस्टेशन कोपरगाव तालुक्यातच राहिले असते तर निश्चितच अजून सबस्टेशन जोडता आले असते. मात्र कोपरगावच्या जनतेच्या दुर्दैवाने दहा वर्षापूर्वी कोळपेवाडी येथे होणारे हे १३२ के.व्ही.ए.चे सबस्टेशन शहाला घालवीण्यात आले.
