अतिवृष्टीत कोपरगाववर आलेले संकट हा लोकप्रतिनिधीचा हलगर्जीपणा  – विवेक कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर युवानेते विवेक कोल्हे यांनी २८ सप्टेंबर रोजी कोपरगाव तालुका आणि शहरातील खडकी भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधत दिलासा दिला.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्था तीन वर्षापासून अस्तित्वात नसून लोकप्रतिनिधींच्या हातात सर्व व्यवस्था आहे. अतिवृष्टी झाल्यास पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नागरी भागात होऊ शकली नाही याला प्रशासक मुख्याधिकारी आणि लोकप्रतीनिधी यांचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल.

या दरम्यान विवेक कोल्हे यांनी या निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अनेक आठवण तलाव आणि बंधारे यांचे काम करण्यासाठी २०२२ मध्ये वर्क ऑर्डर झालेल्या असताना ती कामे केली गेली नाही अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वेळीच बंधारे, पाझर तलाव, नाले रुंदीकरण, खोलीकरण कामे होण्याची गरज होती. खडकी भागातील घरांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साठून मोठे नुकसान होते, कारण विविध भागातून पाणी या सखल भागात जमा होते त्यामुळे यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी त्यांनी केली.

संकटाच्या या प्रसंगी संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवार नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. मतदारसंघातील आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांसाठी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने जेवणाची व आरोग्यसेवेची तत्काळ व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आवश्यक सर्व मदत पुरविण्याचे काम सुरू असल्याचे विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply