कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगाव पंचायत समिती व कोपरगाव तालुका विज्ञान–गणित संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय गणित, विज्ञान व चित्रकला प्रदर्शन (दि.२२) ते (२४) डिसेंबर या कालावधीत के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, कोपरगाव येथे पार पडले. या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलने चित्रकला प्रदर्शनात प्रथम तर विज्ञान-गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

चित्रकला प्रदर्शनात आदर्श मोरे याने सादर केलेल्या सोशल मीडियाचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम या सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रास तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच गणित व विज्ञान प्रदर्शनात समर्थ कुशारे याच्या एक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट या उपकरणाला तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आहे. प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले की, जानेवारी २०२६ मध्ये नागेश्वर विद्यालय, जामखेड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलचे द्वितीय क्रमांक प्राप्त एक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट हे उपकरण सादर करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ शिक्षण समिती सदस्य राजेश परजणे, गट शिक्षणाधिकारी शबाना शेख तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव रोहमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या वेळी तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या तालुकास्तरीय प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूल कडून एकूण तीन गणित व विज्ञान उपकरणे सादर करण्यात आली होती. १ ली ते ५ वी गटात विद्यार्थी इनामदार आर्यन याने मॅथेमॅटिकल पार्क (गणितीय उद्यान) हे अभिनव उपकरण सादर केले. या संकल्पनेत खेळ, मनोरंजन आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून मुलांना भूमिती, अंकगणित, मोजमाप, आकार ओळख अशा विविध गणिती संकल्पना सहजरीत्या समजावून देणारे उपकरण सादर केले. ६ वी ते ८ वी गटात विद्यार्थी शेख मोईन याने पॅराबोलिक सोलर कुकर म्हणजेच सौर ऊर्जेवर चालणारी सौरचूल उपकरण सदर केले.

पर्यावरणपूरक व ऊर्जा बचतीचा संदेश देणारे हे उपकरण सूर्यप्रकाशाचा उपयोग करून स्वयंपाक कसा करता येतो हे दाखून दिले. ९ वी ते १२ वी गटात विद्यार्थी कुशारे समर्थ याने एक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट (अपघात नियंत्रण लिफ्ट) हे अत्यंत उपयुक्त व समाजोपयोगी उपकरण सादर केले. लिफ्ट वापरताना होणाऱ्या संभाव्य अपघातांना कसा प्रतिबंध करता येईल यावर आधारित असल्याने परीक्षकांनी या उपकरणाची विशेष दखल घेतली.

याच प्रदर्शनात आयोजित चित्रकला स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या आदर्श मोरे, गौरव सोनवणे, अथर्व उगले, प्रत्यूष गारे, मुजम्मील पठाण व ओमकार वाघ या विद्यार्थ्यांनी आपली कलात्मक चित्रे सादर केली. या विद्यार्थ्यांना कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. गणित व विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांना परिवेक्षिका ज्योती शेलार, पर्यवेक्षक राजेंद्र आढाव, प्रतिभा बोरणार, गीतांजली खेमनार, सबिया शेख तसेच शाळेतील सर्व गणित व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे,व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, संस्थेचे सर्व विश्वस्त व सदस्य तसेच प्राचार्य नूर शेख यांनी सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


