संजीवनीच्या चित्रकला स्पर्धेत १४५१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक शिक्षक आणि आई-वडील असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शन आणि अनुभवाचे बोल मनापासून ऐकले पाहिजेत. मोठी स्वप्ने पाहा आणि ती साकार करून आई-वडिलांसह शाळेचेही नाव मोठे करा. आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे बदल स्वीकारण्याची आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित केली पाहिजे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बदलांशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही, असे प्रतिपादन संजीवनीच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी केले.

संजीवनी युनिव्हर्सिटी आणि संजीवनी वुमन एम्पॉवरमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला तब्बल १४५१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बक्षिस वितरण प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. कोल्हे बोलत होत्या. व्यासपीठावर वुमन एम्पॉवरमेंट सेलच्या अध्यक्षा डॉ. सोनाली चिने, उपाध्यक्षा डॉ. अश्विनी जमदाडे, डीन डॉ. सरिता पवार, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे, डॉ. मोहिनी गुंजाळ, प्रा . वृंदा कोऱ्हाळकर , डॉ. शाहीन पठाण आदी उपस्थित होते.

इयत्ता ७ वी ते ८ वी या गटासाठी ‘निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा’, ‘माझी शाळा, माझा अभिमान’, ‘पाणी आहे तर जीवन आहे’, ‘स्वच्छ सुंदर भारत’, ‘विज्ञान आणि माझे भविष्य’, ‘प्लास्टिकमुक्त भारत’ आणि ‘संजीवनी’ हे विषय देण्यात आले होते. तर इयत्ता ९ वी ते १२ वी या गटासाठी ‘भारत २०४७: माझ्या स्वप्नातील भारत’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ताः मानवाचा मित्र की भविष्याचे आव्हान?’, ‘युवा शक्ती-राष्ट्राची शक्ती’, ‘मानवता आणि तंत्रज्ञान’, ‘डिजिटल युगातील विद्यार्थी’, ‘सायबर सुरक्षितता- सुरक्षित डिजिटल भविष्य’ आणि ‘संजीवनी’ हे विषय होते.

इयत्ता ७ वी ते ८ वी गट-प्रथम- स्वरूप मांढरे (आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल, कोकमठाण), द्वितीय- राजनंदिनी शिंदे (न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव), तृतीय- ओजस्विनी नरोडे (विद्याप्रबोधिनी प्रायमरी स्कूल, कोपरगाव).उत्तेजनार्थः सौमया वर्मा (के.बी.पी. विद्यालय, कोपरगाव), ईश्वरी हांडे (शिवशंकर विद्यामंदिर, रवंदे), विव्हान मोरे (भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव), वेदांती कर्पे (जनता इंग्लिश मीडियम स्कूल, संवत्सर), अंजली गुडघे (जय हनुमान विद्यालय, रांजनगाव देशमुख).

इयत्ता ९ वी ते १२ वी गटः प्रथम-दर्शना शिंदे (श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल, शिरसगाव), द्वितीय- अंकिता रेपाळे (गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय, कुंभारी), तृतीय- विवेकानंद सुतार (आत्मा मालिक इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज, कोकमठाण) आणि तनिष्का परजणे (डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर, कोपरगाव). उत्तेजनार्थ: श्रेया भंडारी, प्रणव शिंगारे (श्री मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, पोहेगाव), तरुणन्नम पिंजारी (सोमय्या विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी), स्वरा देशमुख (श्री शारदा मीडियम इंग्लिश स्कूल) आणि अलकानंद निरगुडे (कर्मवीर शंकररावजी काळे विद्यालय, करंजी).

दोन्ही गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रू ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये रोख, मानपत्र व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ विजेत्र्यांना ५०० रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान नितीनदादा कोल्हे यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देवुन स्पर्धकांचे मनोबल वाढविले. सजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रसिडेंट अमित कोल्हे व व्हाईस चांसलर डाॅ. ए. जी. ठाकुर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक मतीन दारूवाला आणि बाबा सूर्यवंशी यांनी केले. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच विजेत्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा गोसावी यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक क्षमता आणि कलागुणांची कमतरता नाही, मात्र हे गुण सादर करण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ आणि संधी मिळणे आवश्यक आहे. आजच्या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली आहे. स्पर्धांमधूनच विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यश-अपयशाची चिंता न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रत्येक स्पर्धेकडे शिकण्याची आणि स्वतःला घडविण्याची संधी म्हणून पाहावे. विध्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यात शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या कार्याचेही मी मनापासून अभिनंदन करतो. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शिक्षण, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत पुढे नेण्यासाठी संजीवनी सदैव त्यांच्या पाठीशी आहे- नितीनदादा कोल्हे


