कोपरगाव प्रतिनिधी दि. ९ : कोपरगाव तालुक्यात वाळू तस्करांचा राडा नित्याचा झाला असुन प्रशासनाचा धाक कमी झाल्याने वाळू तस्करांच्या दादागिराला बळ मिळत आहे. चक्क वन विभागाच्या अधिकाऱ्यावर समुहाने हल्ला करुन वन विभागाच्या शासकीय वाहनाची तोडफोड करीत वाळू तस्कारांनी आपली दहशत निर्माण केली आहे. दोन गटातील वाळू युध्द थेट शासकीय अधिकाऱ्यांना मारण्या पर्यंत पोहचले आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या वनविभागाच्या राखीव वनामधून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अहील्यानगर येथील वन विभागाच्या फिरत्या पथकावर समुहाने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडल्यानंतर वन कर्मचाऱ्यांचा रस्ता अडवून त्यांच्यावर लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि कोयत्यांनी हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी शासकीय वाहनाची तोडफोड करून पकडलेला ट्रॅक्टर आणि त्यातील शासनाची एक ब्रास वाळू जबरदस्तीने पळवून नेल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी १४ नामनिर्दिष्ट आरोपींसह ३५ ते ४० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर येथील जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल व विभागीय वन अधिकारी डॉ. अजित साजणे (दक्षता पथक) नासिक यांच्या आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण, अतिक्रमण व निर्मूलन) दादासाहेब ठकाजी वाघुलकर (वय ४५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, भारतीय वन अधिनियम आणि महाराष्ट्र गौणखनिज कायद्यातील विविध तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, योगेश संजय कोळपे यांच्या लेखी ऑनलाइन अर्जाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने वन विभागाचे पथक दि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.३० वाजता कोळगाव थडी येथील वनक्षेत्र गट क्रमांक २४३ मध्ये चौकशीसाठी गेले होते. यावेळी गोदावरी नदीपात्रातून राखीव वनक्षेत्रात अवैध प्रवेश करून वाळूची साठवणूक व चोरटी वाहतूक केली जात असल्याच्या प्रकरणात स्वराज कंपनीच्या मालकीचा ट्रॅक्टर पकडण्यात आला होता.

त्यानंतर ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपींनी इतर अनोळखी इसमांसह वन कर्मचाऱ्यांचा रस्ता अडवून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. शासकीय वाहनाची हत्यारांनी तोडफोड करण्यात आली, तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मी आपल्यावर हल्ला करणा-या काही इसमांना ओळखतो त्यांची नावे 1) दिपक चंद्रभान मोरे रा. कोळगाव थडी 2) आकाश नंदकिशोर निंबाळकर रा. कोळगावथडी 3) देवराम वाल्मीक कोळपे रा. कोळगावथडी 4) निलेश नंदकिशोर निंबाळकर रा. कोळगाव थडी 5) प्रतीक मोहन कोळपे रा. कोळपेवाडी 6) नंदकिशोर लक्ष्मण निंबाळकर रा. कोळगावथडी 7) जालींदर पांढरे रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव 8) राहुल रविंद्र निकाळे रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव 9) संदिप साहेबराव निकाळे रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव 10) वसिम मोहम्मद शेख रा. कोळगाव थडी ता. कोपरगाव 11) किरण साहेबराव निकाळे रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव 12) कृष्णा जनार्दन काळे रा. कोळगाव थडी ता. कोपरगाव असे असल्याचे त्याने आम्हाला समक्ष सांगितले. त्याचप्रमाणे योगेश कोळपे याने देखील व्हॉटअपवर सदर इसमांनीच आमच्यावर जिव घेणा हल्ला केला असलेबाबत माहीती दिली आहे. त्यानंतर आम्ही आमचे तोडफोड झालेले शासकीय वाहन घेऊन आमचे स्टाफसह कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलेलो आहोत.

तरी दिंनाक 08/10/2026 रोजी रात्री 23/30 वाचे सुमारास मी व माझेसह असलेल्या स्टाफने कोळगाव थडी वनक्षेत्र गट क्रमांक 243 मध्ये गोदावरी नदी पात्रातुन राखीव वनक्षेत्रात अवैध रित्या प्रवेश करुन वाळुची साठवणुक करुन चोरटी वाहतुक करणा-या स्वराज कंपनीच्या मालकीच्या ट्रॅक्टरला पकडले म्हणुन दिंनाक 09/10/2026 रोजी 01/00 वाजल्याचे सुमारास आम्ही करत असलेल्या कायदेशीर कामात अडथळा आणण्याच्या उद्देशाने व आम्ही वाळू वाहतुक करणारे वाहन पकडले याचा राग मनात धरुन आम्हास जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी इसम नामे 1) दिपक चंद्रभान मोरे रा. कोळगाव थडी ता. कोपरगाव 2) आकाश नंदकिशोर निंबाळकर रा. कोळगावथडी ता. कोपरगाव 3) देवराम वाल्मीक कोळपे रा. कोळगावथडी 4) निलेश नंदकिशोर निंबाळकर रा. कोळगाव थडी

5) प्रतीक मोहन कोळपे रा. कोळपेवाडी 6) नंदकिशोर लक्ष्मण निंबाळकर रा. कोळगावथडी 7) जालींदर पांढरे रा. कोळपेवाडी 8) राहुल रविंद्र निकाळे रा. कोळपेवाडी 9) संदिप साहेबराव निकाळे रा. कोळपेवाडी 10) वसिम मोहम्मद शेख रा. कोळगाव थडी 11) किरण साहेबराव निकाळे रा. कोळपेवाडी 12) कृष्णा जनार्दन काळे रा. कोळगाव थडी व इतर 35 ते 40 अनोळखी इसमांनी हातात लोखंडी राँड, लाकडी काठ्या, लोखंडी कोयते घेऊन आमचा रस्ता अडवुन आम्ही बसलेल्या शासकीय वाहनावर आम्हास जिवे मारण्यासाठी त्याचेकडील हत्याराने हल्ला केला व आम्ही पकडलेले वाळु वाहतुकीचे ट्रॅक्टर जबरदस्तीने पळुन घेऊन गेले. आमचे कडील शासकीय वाहनाचे त्याचेकडील हत्याराने तोडफोड केली व आम्हास आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली व आम्ही करत असलेल्या शासकीय कामात आडथळा आणला म्हणून माझी नमुद इसमां विरुध्द कायदेशीर र्फियाद आहे.

वन विभागाच्या पथकामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण )दादासाहेब वाघुळकर, वनपाल सचिन शिंदे, वनरक्षक सुरेश भोसले ,वनरक्षक अर्जुन खेडकर, पोलीस काॅनस्टेबल भगीरथ पंचमुख चालक अक्षय ससे यांनी पकडलेल्या ट्रॅक्टरमध्ये शासनाची एक ब्रास वाळू असल्याचे फिर्यादीत नमूद असून, ट्रॅक्टर व वाळू जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप असून गुन्हा दाखल पुढील प्रमाणे भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम- १३२, १२१, १२६(२), १८९(२), १९०, १९१, ३२४(४), ३५१(२), ३५२, ३०३(२)सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ चे कलम- ३, ४ भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम- २६(D), (G), (H), ४१, ४२(२), ५२ महाराष्ट्र गौण खनिज कायदा, १९५७ चे कलम- २१ दाखल झाले असून या घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहे.

वाळू तस्करी संदर्भात शासकीय पातळीवर तक्रार करणारेही वाळू तस्कर आणि शासकीय पथकावर हल्ला करणारेही वाळू तस्कर आहेत. गोदावरी नदीच्या एका ठिकाणावर एका समुहानेच का वाळु उपसावी आम्हाला पण उपसु द्यावी अन्यथा शासकीय यंञणेकडे तक्रार करुन कारवाई करण्यास भाग पाडले जाते. तुम्ही चोरले तर मलाही चोरी करु द्या ही नवीन निती वाळू तस्कारामध्ये सुरु झाल्याने दोन गटातील ह्या वाळू चोरीत शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांचा बळी जातोय.

