दुष्काळ निवारणासाठी देवीला साकडे, पशुधनासाठी चारा व देणगी स्वीकारणार – रेणुकाताई कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : येथील संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या वतीने ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, देवीचा पाठ आणि नामस्मरण होणार आहे. विजयादशमीच्या दिवशी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने महिषासुरदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेक कोल्हे यांनी दिली.

कोपरगावच्या प्रथम महिला मा.आ.स्नेहलताताई कोल्हे आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर रोजी देवीची स्थापना आणि आदिशक्ती कुंकुमार्चन ग्रुपच्या कार्यक्रमाने उत्सवाची सुरुवात होणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी भानुदास बैरागी व सहकारी भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल.१३ ऑक्टोबर रोजी दुष्काळ निवारणासाठी देवीला साकडे घातले जाणार असून जुनी गंगा देवी येथे पायी प्रस्थान केले जाणार आहे. सावित्रीच्या लेकी ग्रुपच्या वतीने धार्मिक कार्यक्रम होईल.

१४ ऑक्टोबर रोजी एकादशी भजनी मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ आणि संवेदिनी महिला मंडळाचे कार्यक्रम होतील. १५ ऑक्टोबर रोजी देवीचा पाठ, १६ ऑक्टोबर रोजी रेणुका माता कुंकुमार्चन ग्रुप, १७ ऑक्टोबर रोजी वैष्णवी कुंकुमार्चन ग्रुप आणि ब्राह्मण समाज महिला मंडळाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.१८ ऑक्टोबर रोजी गोरक्षण महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम आणि देवीचे नामस्मरण होईल, तर १९ ऑक्टोबर रोजी कुमारिका पूजन आणि वनिता महिला मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.

२० ऑक्टोबर रोजी विजयादशमी व दसऱ्यानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने महिषासुरदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत दररोज सायंकाळी ७.३० वाजता देवीची आरती आणि जोगवा होणार आहे. भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.यंदाच्या नवरात्रोत्सवात धार्मिक उपासनेसोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यावर भर देण्यात आला आहे.

दुष्काळी परिस्थितीत पशुधन जगविण्यासाठी चारा आणि देणगी स्वीकारण्यात येणार आहे. यासाठी कोपरगाव येथील तहसील मैदानावर व्यवस्था करण्यात आली आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करून पशुधन संवर्धनासाठी हातभार लावावा, असे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली असून यंदा नवरात्रोत्सवानिमित्त दुष्काळ निवारणासाठी देवीला साकडे घालण्यात येणार आहे. भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पशुधन जगविण्यासाठी चारा व देणगी देऊन समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व पशुधन संवर्धनासाठी हातभार लावावा. – रेणुकाताई विवेक कोल्हे, अध्यक्षा, संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गट

Leave a Reply