कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे झाले आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. याचा अभ्यास करुन जनतेला, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती तसेच आपल्या कलागुणांचा वापर करून अप्रतिम असे चित्रप्रदर्शन विद्यार्थ्यांनी केलेले आहे, असे प्रतिपादन प्रकाश सांगळे यांनी केले.
श्रीगणेश शिक्षण संस्था आयोजित विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनात, ११४ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. विज्ञान व गणित यांचा सुयोग्य वापर करून तयार केलेल्या प्रकल्पाद्वारे अनोख्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रकाश सांगळे, अनिल किसान लोखंडे, सुनील आढाव, श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे,उपाध्यक्ष संदीप चौधरी,सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल , गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रामनाथ पाचोरे, पंकज खंडांगळे, प्रवीण चाफेकर, मंजुश्री गोर्डे, सविता वाबळे हे उपस्थित होते.
अनिल लोखंडे म्हणाले कि, प्रत्येक मुलात संशोधक लपला असून, त्याला जागे करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सांगून, विद्यार्थ्यांच्या व्यापक वैज्ञानिक दृष्टीकोनाचे आणि कलेचे कौतुक केले. सुदृढ आरोग्य, संसाधन व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक आणि दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती ह्या सर्व विषयावर विद्यार्थ्यांनी विविध उपकरणे तयार केलेली आहे. असे प्रतिपादन सुनील आढाव यांनी केले.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर करुन विज्ञान, गणित व चित्रकला विषयी गोडी दाखवून दिली आहे. विद्यार्थीदशेत कलेचे आणि संशोधनाचे बीज रोवावे, या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे प्रा. विजय शेटे यांनी सांगितले.
सर्व विद्यार्थ्यांना कलेचे ज्ञानेश्वर भिंगारे आणि विज्ञानसाठी विजय जगताप, आदिनाथ दहे, रोहिणी खंडांगळे, मयुरी जगताप,दीपक गव्हाणे,वैष्णवी सुराणा, अनिता कुदळे, निलेश देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ पाठक यांनी तर आभार रामनाथ पाचोरे यांनी मानले.