कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शेवगांव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या संघाने आपल्या खेळाचे कसब दाखवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवुन वर्चस्व सिध्द केेले, अशी माहिती संजीवनी अकॅडमीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, उपांत्य फेरीत संजीवनीच्या संघाने आत्मा मालिक, कोकमठाण संघावर १७-४ अशा गुणांनी दणदणित विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तर अहमदनगर येथिल संघाला १४-० अशा गुणांनी हरवुन एकतर्फी विजय मिळविला. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात संजीवनीच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला एकही गुण मिळवायची संधी दिली नाही.
या स्पर्धेत संजीवनी अकॅडमीची क्रीडारत्न आर्या रविंद्र पवार या खेळाडुने अष्टपैलू खेळ करत सामनावीरचा मान मिळविला. तिच्या नेतृत्वाखाली वैष्णवी हरीदास धोंडे, सिध्दी संजय जोर्वेकर, सिध्दी प्रविण बोठे, पुणम महेंद्र चेमटे, समिधा राजेंद्र गवळी, राधिका अभय देशमुख, अनुष्का सचिन उंडे व जयश्री संजय तुळसकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी संघाला शुन्यावर बाद करीत आता सोलापुर येथे होणाऱ्या विभागीय सामन्यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व हाती घेतले आहे. तेथेही जिंकण्याच्या जिध्दीने क्रीडा प्रशिक्षक विरूप रेड्डी व सुजय कल्पेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्या शैला झुंजारराव व विरूप रेड्डी उपस्थित होते.