कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील प्रमुख रस्त्यांची कामे उत्कृष्ठ दर्जाची झालेली असून अजूनही काही महत्वाच्या रस्त्यांची कामे प्रलंबित असून त्यासाठी निधी देखील मंजूर आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची कामे तातडीने सुरु करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी केली असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात मंदार पहाडे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील प्रमुख रस्ता म्हणून गणला जाणाऱ्या धारणगाव रस्त्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी दिला असून या रस्त्याचे काम काही अंशी पूर्ण झाले असले तरी साईंड पट्ट्या व पेव्हिंग ब्लॉक्स बसविण्याचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच कोपरगाव शहराच्या प्रभाग क्रमांक ६ मधील अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या बँक रोड श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालय, सोमासे रोड ते धारणगाव रोड, अरशी कॉम्प्लेक्स ते ढमाले घर, कन्या विद्या मंदिर ते शेतकरी बोर्डिंग या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. या सर्व रस्त्यांसाठी निधी मंजूर आहे.
सर्व शासकीय इमारती असलेला मुख्य बाजारपेठेतील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालय या रोडवर भाजीपाला विक्रेते असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र हे महत्वाचे रस्ते खराब झाल्यामुळे या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे केली असल्याचे मंदार पहाडे यांनी सांगितले आहे.