शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : तालुक्यातील संवेदनाशील आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या अशा खरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमधील अनपेक्षित घडामोडीतून निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची खरिप हंगामाची कर्ज प्रकरणे ठप्प झाली आहेत.
सहाय्यक निबंधक व जिल्हा सहकारी बँकेच्या तालुका विकास अधिकार्यानी त्यातून मार्ग काढावा. खरिप कर्ज प्रकरणे त्वरित मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ते कॉ. बबनराव लबडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील खरडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तेरा सदस्यापैकी संस्थेचे व्हाईस चेअरमन छगन साबळे यांचे दोन महिन्यापूर्वी निधन झाले . तर दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या, घुले गटाच्या सहा सदस्यांनी राजीनामे दिले. उत्वरित सहा सचालक जनशक्ती मंडळाचे असून ते अल्पमतात आले आहेत.
त्यामुळे चालू खरीप हंगामाची शेतकऱ्यांची सर्व कर्ज प्रकरणे ठप्प झाली आहेत. मागील वर्षाचे अनुदान अद्याप अनेकांना मिळाले नाही. त्यातच नुकत्याच झालेल्या वादळ वारा व गारपीटीने पीकांचे मोठे नुकसान केले आहे. अशा वेळी शेतकर्यांना आर्थिक आधाराची गरज असतांना खरडगाव सेवा सहकारी संस्थाच गोत्यात सापडली आहे. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सहकार खाते व जिल्हा सहकारी बँकेने मार्ग काढणे आवश्यक असल्याचे शेवटी नमुद करण्यात आले आहे.