भोजडे येथे जागतिक आदिवासी दिन साजरा
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०९ : आदिवासी समाज आणि कोल्हे परिवार यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून ऋणानुबंध असून, ते आजही कायम आहेत. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे, माजी आ. स्नेहललता कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आदिवासी समाजाचे विविध प्रश्न शासनदरबारी मांडून ते सोडवले. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.
कोल्हे परिवार व आपण कायम आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आदिवासी समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू, अशी ग्वाही सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील भोजडे येथे बुधवारी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विवेक कोल्हे यांनी वीर एकलव्य यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून, अभिवादन केले व आदिवासी बंधू, भगिनींना जागतिक आदिवासी दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी विवेक कोल्हे यांच्या हस्ते भोजडे येथे नव्याने स्थापन झालेल्या, वीर एकलव्य ग्रुपचे उदघाटन व नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमास ज्ञानेश्वर बाबुराव सिनगर, रंगनाथ राजाराम सिनगर, बाळासाहेब अहिलाजी सिनगर, संजय रंगनाथ सिनगर, कैलास भोजराज धट, देवराम तुळशीराम मंचरे, प्रमोद सिनगर, वाल्मिक बोर्डे, भगत बाबा, ढेपले, सचिन सिनगर, वीर एकलव्य ग्रुपचे अध्यक्ष कृष्णा आहेर, संघटक महेंद्र आहेर, भाऊसाहेब मोरे, सचिन घनघाव, अशोक आहेर, चरपटीनाथ आहेर, संजय आहेर आदींसह आदिवासी समाजबांधव, भोजडे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब सोनवणे व इतरांनी विवेक कोल्हे यांचे स्वागत केले.
विवेक कोल्हे म्हणाले, आपल्या देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजबांधवांचा मोलाचा वाटा असून, भारताचा इतिहास, स्वातंत्र्यलढा, सैन्य दल, नृत्यकला, शिक्षण, क्रीडा, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात आदिवासी समाजबांधव अग्रेसर आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आदिवासी समाज हा संघर्षशील समाज असून, ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजबांधव राहत आलेले आहेत. ते भारताची प्राचीन संस्कृती जतन करण्याचे काम करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवन कसे जगावे, हे आपण आदिवासी समाजबांधवांकडून शिकले पाहिजे.
कोल्हे परिवार आणि आदिवासी समाज यांच्यात आपुलकीचे, प्रेमाचे नाते आहे. माझे बालपण आदिवासी समाजातील मुलांच्या सानिध्यात गेले. त्या काळात मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आदिवासी समाजाचे विविध प्रश्न सोडवून, त्यांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न केले. त्यांनी शासनाकडून आदिवासी समाजाला खावटी कर्ज, उदरनिर्वाहासाठीचे साहित्य, घरकुल व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला.
आपण या देशाचे प्रथम निवासी आहोत, याचा आदिवासी समाजाने नेहमी अभिमान बाळगला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करून आदिवासी समाजाचा व तमाम महिलांचा सन्मान केला. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या असून, ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे.
आदिवासी समाजात अनेक चांगले खेळाडू आहेत. आदिवासी समाजातील खेळाडूंनी नेमबाजी स्पर्धेत भारताला अनेक पदके मिळवून दिली आहेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे. आदिवासी समाजातील युवकांनी आय.ए.एस, आय.पी.एस अधिकारी यासारख्या मोठ्या पदांवर पोहोचण्याचे ध्येय उराशी बाळगून उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, आदिवासी समाजाची संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे जतन करून आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक प्रयत्न होण्याची गरज आहे. आदिवासी समाजातील नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांना लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असेही विवेक कोल्हे यांनी सांगितले.