शेवगाव प्रतिनिधी, दि १/९/२३
गेल्या काही दिवसापासून शेवगावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी व मोकाट कुत्र्यांच्या टोळीने उच्छाद मांडला आहे, कुत्र्यांनी काही बालकांना चावा घेऊन जायबंदी केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नगरपरिषदेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच शहरातील प्रभाग क्रमांक १२ लक्ष्मीनगर परिसरात गटारीचे चेंबर फुटून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर इतस्ततः पसरल्याने सर्वत्र दूर्गंधी पसरली असून डास मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नगरपरिषदेने लक्ष्मी नगरसह शहरातील विविध भागात औषध फवारणी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, शहराध्यक्ष प्रीतम (पप्पू) गर्जे यांच्यासह वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सचिन राऊत याचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत तातडीने कारवाई झाली नाही तर वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोकाट पिसाळलेले कुत्रे नगर परिषदेमध्ये आणून सोडण्यात येतील, तसेच लक्ष्मी नगर परिसरातील घाण कचरा व दुर्गंधी युक्त गटारीचे पाणी नगरपरिषदेत आणून टाकण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी भाई पाटेवाले, हुशार मामा, सुधीर भामरे, आरिफ शेख आदि उपस्थित होते.