कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०३ : मैदानी खेळाचे मैदाने पाऊसामुळे खराब होवुन खेळांसाठी व्यत्यय येतो. त्यामुळे खेळाडूंचा हिरमोड होतो व बाहेरून आलेल्या खेळाडूंनाही मनस्ताप सहन करावा लागतो. हे होवुच नये म्हणुन कोपरगांव तालुका क्रीडा समितीच्या वतीने शासनाकडे भव्य इनडोअर गेम हॉल बांधण्यासाठी रू ४. ५ कोटीची मागणी करून पाठपुरावा चालु आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त व क्रीडा प्रेमी सुमित कोल्हे यांनी दिली.
कोपरगाव तालुका क्रीडा समितीने आयोजीत केलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हे बोलत होते. यावेळी कोपरगाव क्रीडा समितीचे अध्यक्ष नितिन निकम, उपाध्यक्ष नारायण शेळके, सचिव अनुप गिरमे, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पाटणकर, विविध संघांचे प्रमुख व खेळाडू मोठ्या संख्येने हजर होते.
प्रास्तविक भाषणात गिरमे यांनी सांगीतले की पावसामुळे खेळाचे मैदान काहीसे खराब झाले होते. म्हणुन या स्पर्धा पुढे ढकलाव्यात की काय? अशा विवेंचनेत असताना आम्हाला सुमित कोल्हे यांनी संजीवनी सैनिकी स्कूलचे मैदान उपलब्ध करून दिले, आणि स्पर्धेचे उद्घाटन वेळेवर पार पडले.
कोल्हे पुढे म्हणाले की कोपरगाव तालुक्यातील खेळाडूंच्या खिलाडू वृत्तीला चालना देण्यासाठी व त्यांचे कौशल्य विकसीत करण्यासाठी संजीवनी परीवार व कोल्हे कुटूंबिय त्यांच्या बरोबर कायम होता व आहे आणि कायम राहील. कबड्डी हा बुध्दी चातुर्य वापरून योग्य क्षणी योग्य निर्णय घेवुन ताकदीचा खेळ आहे. या खेळामुळे संघभावना वाढीस लागुन एकमेकांच्या सहकार्याने यश मिळविण्याची सवय लागते.
ही भावना भविष्यातही यश मिळविण्यासाठी उपयोगी पडते. या स्पर्धांसाठी तालुक्यातील सुमारे १००० खेळाडू सहभागी झाले होते, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच खेळात काही दुखापत झाली तर षेजारीच असलेल्या संजीवनी आयुर्वेदा कॉलेजच्या हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार करण्यात येईल असेही सांगीतले.
क्रीडा समितीचे अध्यक्ष निकम म्हणाले की, तालुक्यातील सर्वच क्रीडा स्पर्धांना संजीवनीचे सहकार्य असते. स्व. शंकरराव कोल्हे यांनी या क्रीडा संकुलास संजीवनीची जागा उपलब्ध करून दिली व ते काम पुर्णत्वासही नेले असे सांगुन स्व. कोल्हे यांचे काळातील काही आठवणी जागवल्या.