कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : चालू वर्षी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सरासरीचे ४२ टक्के पाऊस झालेला असून जायकवाडीचे पाणलोट क्षेत्रात सरासरीचे ८४ टक्के पाऊस झालेला आहे. जायकवाडी धरणाचा पाणी साठा देखील समाधानकारक आहे. याउलट गोदावरी कालव्यांचे लाभक्षेत्रात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे.
गोदावरी संपूर्ण कालव्याच्या लाभक्षेत्रात अतिशय चिंताजनक परिस्थिती असून जायकवाडी धरणात पुरेसा पाणी साठा असताना समन्यायी पाणी वाटप कायद्याने नगर-नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नका असे निवेदन आ. आशुतोष काळे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे प्र. कार्यकारी संचालक विजय घोगरे यांना दिले आहे.
आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील कार्यकर्त्यांसह संभाजीनगर येथे जावून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे प्र. कार्यकारी संचालक विजय घोगरे यांची भेट घेतली. त्यांना गोदावरी कालव्यांच्या लाभ क्षेत्रातील दुष्काळी परिस्थिती समजावून सांगितली व जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे लाभक्षेत्रावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.
कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा पर्जन्य छायेत येत असून गोदावरी उजवा व डावा तट कालव्याच्या माध्यमातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर मतदार संघातील शेती, पीण्याचे पाणी व उद्योग अवलंबून आहेत. नाशिक येथील धरणांवर बिगर सिंचनाचे आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतीसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात तुट निर्माण झालेली असताना अशा परिस्थितीत समन्यायी पाणी वाटप कायद्याने जायकवाडीसाठी पाणी सोडले जात असल्यामुळे गोदावरी कालव्यांचे लाभक्षेत्र, फळबागा, उद्योग धंदे यांचेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आलेला आहे.
जायकवाडी धरणात पाणी उपलब्ध होण्यासाठी गोदावरी अभ्यास गटाने (मेंढेगिरी समिती) सन २०१३ मध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील अहमदनगर व नाशिक धरणांचे लाभक्षेत्रावर अन्याय करणारी आकडेवारी नमूद केलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांनी दि. १९/०९/२०१४ रोजी आदेश देऊन जायकवाडी धरणात पाणी उपलब्ध होणेसाठीचे विनिमय जाहीर करून सदर आदेशाचा प्रत्येक वर्षी सुधारित विनिमय तयार करणे अपेक्षित आहे.
परंतु प्राधिकरणाने सुधारित विनिमय तयार केलेले नसून दि.१७/०२/२०२० रोजी गोदावरी अभ्यास गट अहवाल सन २०१३ चे आधार सामग्रीचे पुनर्विलोकन प्रसिद्ध केलेले आहे. परंतु आजपर्यंत गायडिंग प्रिन्सिपल सुधारित केलेले नाही. त्यामुळे अहमदनगर नाशिक लाभक्षेत्रावर मोठा अन्याय होत आहे.
महाराष्ट्र शासनाने दि.२६/०७/२०२३ रोजी जायकवाडी धरणाबाबत मार्गदर्शक विनिमय तयार करणे करिता नवीन समितीची नेमणूक केलेली आहे. त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यांनी पाणी साठ्याचा अभ्यास करून कोणतीही सुधारित गायडिंग प्रिन्सिपल तयार केलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये कालबाह्य झालेल्या गोदावरी अभ्यास गट अहवाल सन २०१३ चे आधारे प्राधिकरणाने दि. १९/०९/२०१४ चे आदेशानुसार पाणी सोडण्याची कार्यवाही करणे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर अन्याय करणारे आहे.
जायकवाडी धरणात दि.२५/०६/२०२३ रोजी २७.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. त्यानंतर पावसाळ्यात १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून २४.३४ टीएमसी पाणी वाहून गेले आहे. त्याची एकूण टक्केवारी ३२.४५ होत असून एकूण ५९.६९ टक्के पाणीसाठा आज रोजी जायकवाडी धरणात उपलब्ध आहे.
जायकवाडी धरणाची पाणीसाठ्याची आकडेवारी पाहता १४००० स्के. कि.मी फ्रि कॅचमेंट मधून कोणतेही पाणी उपलब्ध झाल्याचे दिसून येत नाही. याबाबत आपण कार्यवाही करणे आवश्यक आहे. जायकवाडी धरणातील पाणी साठ्यातून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत पाणी उपसा होतो व आजही सुरु आहे त्याचा कुठेही पाणी वापर दिसून येत नाही.
गोदावरी अभ्यास गट (मॅढेगिरी) अहवाल सन २०१३ महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दि.१७/०२/२०२० रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास केला त्यात जायकवाडी धरणात बिगर सिंचनाची, बाष्पीभवनाची गरज खूप मोठ्या प्रमाणात जास्त धरलेली आहे. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील लाभक्षेत्रासाठीची शेती पाण्याची आवश्यकता, बिगर सिंचन पाणी वापर शेती खूप कमी धरलेली आहे.
तसेच गोदावरी अभ्यास गट अहवाल सन २०१३ व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचा सन २०२० चा पुनर्विलोकन आधार सामुग्रीचा तुलनात्मक अभ्यास केला. आकडेवारी मध्ये फार मोठा फरक दिसून येत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे प्र. कार्यकारी संचालक विजय घोगरे यांच्या लक्षात आणून देत पाणी सोडण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नवीन समितीचा अहवाल आलेला नसल्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी दि. १७/०२/२०२० रोजी जाहीर केलेल्या आधार सामुग्रीच्या आधारे जायकवाडी धरण्यात समन्यायी पाणी वाटप कायद्याने पाणी सोडणे बाबत विचार केल्यास नगर नाशिक धरणांचे लाभक्षेत्रावर काही प्रमाणात अन्याय दूर होण्यास मदत होणार असून एकूण परिस्थितीचा सविस्तर अभ्यास करून दुष्काळी परिस्थितीत जायकवाडीला पाणी सोडू नका असे दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
यावेळी काकासाहेब जावळे, सोमनाथ चांदगुडे, ज्ञानदेव मांजरे, आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, बाळासाहेब बारहाते, अशोक काळे, संजय आगवण, राजेंद्र खिलारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप बोरनारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक राजेंद्र निकोले, शिवाजी देवकर, रामदास केकाण, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव आदी उपस्थित होते.