प्रभू श्रीरामाची गाणी गाणाऱ्याच्या मानगुटीवर तलवार ठेऊन जीवे मारण्याची धमकी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : गावात आलेले डोंबारी श्री प्रभू रामचंद्राची गाणी गात असताना चार जणांच्या टोळक्याने त्यास विरोध केला. एकाने त्याला कोयता तर दुसऱ्याने तलवार लावून हे गाणे बंद कर, नाही तर तुम्हाला इथेच भोसकून टाकू असा दम दिला. तेव्हा प्रेक्षकातील तिघांनी कार्यक्रम का बंद पडला असे विचारले असता तुम्हाला देखील भोसकून मारून टाकू असा दम दिला. ही घटना तालुक्यातील जुने दहिफळ येथे शुक्रवारी दि. 3 रात्री साडे आठच्या दरम्यान घडली. त्यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात तालुक्यातील जुने दहिफळ येथील गोकुळ हरिचंद्र व्यवहारे (वय ३३) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात समीर फिरोज शेख, आफरोज पापाभाई शेख, आरीफ दस्तगीर पठाण व भोऱ्या फिरोज पठाण सर्व राहणार जूने दहिफळ या चौघा विरुद्ध रीतसर फिर्याद दाखल केली. फिर्यादीत असे म्हटले आहे की, दहिफळ ग्रामपंचायतीच्या प्रांगणात शुक्रवारी (दि.३) रात्री आठच्या दरम्यान डोंबाऱ्याचा खेळ चालू होता. ते श्री प्रभूरामचंद्राचे गाणे गात होते. तेव्हा भोर्‍या फिरोज पठाण ते गाणे बंद कर म्हणून कोयता घेऊन धावला. अफरोज पापाभाई शेख याने डोंबाऱ्याच्या मोठ्या मुलास तलवार लावून गाणे बंद केले नाही तर येथेच भोसकून टाकतो, अशी दमबाजी केली. हे आमच्यासमोर घडल्याने कार्यक्रम का बंद केला म्हणून मी तसेच भगवान साहेबराव भोसले व रवींद्र भगवान व्यवहारे यांनी विचारणा केली. तेव्हा तुम्हाला देखील भोसकून जिवे मारून टाकू असा दम दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

व्यवहारे यांच्या तक्रारीवरून शेवगाव पोलिसात भा.द.वि. कलम आर्म अॅक्ट सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार अधिक तपास करत आहेत. ही तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारदार व्यवहारे यांचे समवेत शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे पोलीस ठाण्यात गेले.

उपस्थित अधिकारी व या कार्यकर्त्यांची तक्रार दाखल करण्यावरून मोठी बाचाबाची झाली. अखेर कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला. नंतरच तक्रार दाखल करून घेण्यात आली. यावेळी संबंधित अधिकारी व कार्यकर्त्यांत झालेल्या बाचाबाचीची क्लिप प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.