शेवगाव प्रतिनिधी, दि.१७ : फटाक्यांची आतिषबाजी, नवीन कपड्यांची खरेदी, लाडू-शंकरपाळे-करंजी-चिवडा असा गोडधोड पदार्थांचा फराळ, आकाश-कंदील, आणि घरादारावर सजणाऱ्या पणत्यांचा दीपोत्सव तसेच भाऊबीज निमित्त बहिणींना भावाकडून मिळणारी माहेरची साडी अशा विविध संस्कृतीची देवाण-घेवाण केल्या जाणारा हा सण मात्र, कित्येक जण कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी ऊसतोड कामगार, वीटभट्टी, कामगार, म्हणून सातत्याने स्थलांतर करत असतात.
जिथे राहण्याचाच ठिकाणा नाही तिथे या कुटुंबांना कसली आली दिवाळी वा दीपोत्सव पाचटाच्या कोपीत रहायचे आणि अर्ध्या रात्रीच उठून थंडी गाऱ्याचे आपल्या छोट्या छोट्या लेकरांसह ऊसाचा फड गाठायचा अशा धावपळीत दिवाळी त्यांच्या ध्यानी मनी नसते. स्नेहालय व डॉ. गिरीष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व इनर्व्हील क्लब, रोटरी क्लब, गोविंदा गृप, जागर आदि गृप सह संवेदनाशील देणगीदारांच्या सहयोगातू या वर्षी उचल फाउंडेशनची ही दिवाळी शेवगाव परिसरातील गंगामाई साखर कारखान्यावरील घोटण येथे असणाऱ्या गाडीतळावर साजरी करण्यात आली.
या वेळी महिलांना डॉ. मनीषा लड्डा यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. राजश्री रसाळ यांनी तेथील मुलांना व्यसनापासून दूर रहाण्याचा सल्ला दिला.
यावेळी वसुधा सावरकर, मीनाक्षी शिंदे, काजल बिडकर, अस्मिता बिडकर, नाशिकचे उपनिरीक्षक सुनील बिडकर, आदर्श शिक्षक अशोक बिडकर उपस्थित होते.
यावेळी ऊसतोडणी कामगार कुटुंबातील ५० महिलांना साडी, पुरुषांना कपडे तसेच सर्वांना दिवाळी फराळ देण्यात आला. तसेच त्यांच्या तीन मुली व एक मुलाचे शैक्षणिक पालकत्वही उचल फाउंडेशनने स्वीकारले. ऊसतोड महिला कामगार ललिता खेडकर, सोनाली केदार, वनिता आंधळे, उर्मिला गीते आदी महिलांनी आपले ऊसतोडणीचे अनुभव, व आरोग्याच्या समस्या मांडल्या. उचल फाउंडेशनच्या सचिन खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.