कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला खंदक नाल्याचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे खंदक नाला परिसरातील व्यावसायिक व नागरिकांची अडचण कायमची दूर होऊन व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील इतर शहराच्या तुलनेत मागे असलेल्या कोपरगाव शहराचा विकास करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोटयावधी रुपये देवून शहराचा विकास साधला आहे. त्याचबरोबर अनेक महत्त्वाची विकास कामे करून वर्षानुवर्षापासून रखडलेले विकासाचे प्रश्न सोडविल्यामुळे. कोपरगाव शहराच्या अनेक समस्या कायमच्या सुटल्या आहेत.
यामध्ये कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न, रस्ते, शहर सुशोभीकरण, हद्दवाढ झालेल्या नागरिकांच्या विकासाचे प्रश्न अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबरोबर अत्यंत महत्त्वाचा असलेला खंदक नाल्याचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला आहे. या खंदक नाल्यामुळे परिसरातील व्यावसायिकांना व वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास या पुराचे दुर्गंधीयुक्त पाणी छोट्या मोठ्या व्यवसायिकांच्या दुकानात व नागरिकांच्या घरात शिरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होवून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे. तसेच पावसाळ्यात हा रस्ता देखील बहुतांशी बंद राहत असल्यामुळे त्याचा परिणाम व्यावसायिकांच्या व्यवसायावर होत होता. मात्र त्याकडे आजपर्यंत कुणाचे लक्ष गेले नव्हते.
नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी खंदक नाल्याची उंची वाढवण्यासाठी ५० लक्ष रुपये निधी देऊन या पूलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे पूलाची उंची वाढली जाऊन रहदारीची समस्या देखील मार्गी लागली असून पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास देखील यापुढे कायमचा थांबनार आहे. त्यामुळे व्यवसाय वृध्दी होणार असून परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.