शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : श्री क्षेत्र अमरापुर ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी भारतीय प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन गावाचे सुपुत्र श्री. रेणुका माता मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भालेराव यांनी, ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानास मदत म्हणून ५० हजार रुपयाचा धनादेश दिला. या पूर्वी देखील भालेराव यांनी गावातील ग्रामदैवतांच्या जीर्णोद्धारासाठी तसेच ग्रामपंचायती साठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, प्राथमिक शाळेस खेळणी, व प्रोजेक्टर अशा स्वरूपाची भरीव मदत दिली आहे.
भूमिपूत्र भालेराव यांनी गावासाठी वेळोवेळी प्रसंगानुरूप केलेल्या लाखो रुपये मदती बद्दल तसेच सरपंच आशा गरड यांनी सरपंच पदाची धुरा सांभाळल्यापासून स्वतः च्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान न घेता, गावातील माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, विधवा महिला, यशस्वी उद्योजक भूमिपुत्र यांना ध्वजारोहणाचा मान देण्याचा उपक्रम जोपासला आहे. त्या बद्दल भालेराव नाना व सरपंच आशा गरड यांच्या कार्याचे तालुक्यातून कौतुक होत आहे.