कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : मागील तीन वर्षापासून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मागील तीन वर्षापासून अहमदनगर येथे जाण्यासाठी कोपरगाव येथून वाहन सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या आ. आशुतोष काळे यांनी नासिक जिल्ह्यातील घोटी या ठिकाणी एस.एम.बी.टी. हॉस्पिटलमध्ये मतदार संघातील रुग्णांना विविध आजारांवर मोफत उपचारासाठी देखील मोफत वाहन सेवा उपलब्ध करून दिली आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध लाभदायी योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना घेण्यासाठी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मतदार संघातील दिव्यांग बांधवांना अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये जावे लागत असे. कोपरगाव पासून जवळपास १०० किलोमीटर असणाऱ्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये जाणे हे दिव्यांग बांधवांसाठी व त्यांच्या पालकांसाठी मोठे दिव्यच होते.
त्यामुळे दिव्यांग बांधवांना व त्यांच्या पालकांना होणारा त्रास कमी व्हावा. तसेच दिव्यांग बांधवांना सहजपणे दिव्यांग प्रमाणपत्र उपलबद्ध होवून त्यांना शासनाच्या सोयी सुविधांचा लाभ मिळावा. यासाठी मागील तीन वर्षापासून दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी आ.आशुतोष काळे यांनी दिव्यांग बांधवांना अहमदनगर येथे जाण्यासाठी करण्यात आलेली मोफत वाहन सेवा आजही अविरतपणे सुरु आहे.
या उपक्रमाची व्याप्ती वाढवतांना आ.आशुतोष काळे यांनी या सेवेबरोबरच नासिक जिल्ह्यातील घोटी येथील प्रसिद्ध असलेले एस.एम.बी.टी. हॉस्पिटल या ठिकाणी गरजू रुग्णांची मोफत तपासणी होवून त्यांच्यावर मोफत उपचार व्हावेत यासाठी मतदार संघातील रुग्णांना एस.एम.बी.टी. हॉस्पिटल येथे जाण्यासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून दिली आहे. पहिल्याच बस मध्ये एकूण ४२ रुग्णांनी मोफत बस सेवेचा लाभ घेतला आहे.
या बसला एस.एम. बी.टी. हॉस्पिटलचे मार्केटिंग एक्झीक्युटिव्ह अक्षय मगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा, माजी नगरसेवक मंदार पहाडे, दिनकर खरे, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राजेंद्र आभाळे, शुभम लासुरे, गणेश बोरुडे, अजय ढमाले यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या सर्व रुग्णांच्या विविध आजारांच्या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या असून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे.
यापुढे देखील रुग्णांवर मोफत तपासणी व उपचारासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले असून मतदार संघात विकास कामांचा डोंगर उभा करतांना अशा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात पुढाकार घेणाऱ्या आ. आशुतोष काळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.