कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : ज्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता होती त्यावेळी त्यांनी किती प्रश्न सोडविले व चार वर्षात मतदार संघातील किती प्रश्न सुटले हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे मागील चार वर्षातील कामगिरीवर मतदार संघातील जनता समाधानी आहे. परंतु ज्याचे अस्तित्व संपत चालले आहे त्यांच्याकडून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी उगाचच आकांड-तांडव करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे. मात्र, जनता माझ्या सोबत असल्यामुळे त्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत. जनतेची काळजी घेण्यासाठी आपण सक्षम असून विरोधकांना मात्र, त्यांच्या राजकीय अस्तित्वाची चिंता पडली असल्याची बोचरी टीका आ. आशुतोष काळे यांनी कोल्हेंवर केली आहे.
कोपरगाव तहसील कार्यालयात आ. आशुतोष काळे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून नागरिकांना मिळणाऱ्या विविध शासकीय लाभाच्या योजनांचा आढावा घेवून तातडीने प्रस्ताव तयार करावेत व जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरी घेवून शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करून गरजू पात्र लाभार्थ्यांच्या ८११ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, सार्वजनिक विकास कामांबरोबरच नागरिकांच्या रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आजवर पाठपुरावा करून हे प्रश्न सोडविले आहे.
समाजातील निराधारांना आधार देवून त्यांना मदत देण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून चारच वर्षात जवळपास ०८ हजार ५३५ पस्तीत पात्र गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. याउलट २०१४ ते २०१९ या पाच वर्षात हा आकडा मात्र, २ हजार १११ एवढाच असून मागील चार वर्षातील आकडा विरोधकांच्या पाच वर्षातील आकड्यापेक्षा चारपट जास्त आहे.
विकासाच्या बाबतीत मतदार संघाचा झालेला विकास, सुरु असलेली विकास कामे व मतदार संघाचा बदलेला चेहरा मोहरा विरोधकांना देखवत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने नागरिकांची कामे होत असल्यामुळे ज्यांना काही काम नाही, ज्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्याकडून जनतेत संभ्रम पसरविण्याचा व जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. मागील चाळीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती. त्यांना सार्वजनिक विकासकामे देखील करता आले नाही. व्यक्तिगत कामासाठी त्यांच्या मागे पळावे लागत होते. त्यांनी शिकवण्याची गरज नाही. मी नागरिकांच्या गरजा ओळखून काम करतो असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी ठासून सांगितले.
ज्यांना स्विमिंग पूल बांधता आला नाही, बस स्थानकाचे काम व्यवस्थित करता आले नाही. नागरिकांच्या गरजा ज्यांना ओळखता आल्या नाही. त्यांनी दिशाभूल करू नये, जनता त्यांच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही. २९०० कोटीचा निधी आणून झालेला विकास जनता पाहत आहे. कोपरगाव शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे झाल्यामुळे नागरिक स्पीड ब्रेकरची मागणी करीत आहे. यापूर्वी कधी नागरिकांनी स्पीड ब्रेकरची मागणी केली का? असा उलट प्रश्न उपस्थित करून नागरिकांचा व मतदार संघाच्या विकासाचा स्पीड वाढला असल्याचे अधोरेखित होत आहे.
५ नंबर साठवण तलावाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे हे काम होवू नये यासाठी दर दोन महिन्याला विरोधक न्यायालयात जात आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असून माझ्या पद्धतीने मी लढत आहे. जनतेचे प्रश्न सुटले तर राजकारण संपणार आहे. मग कोणत्या प्रश्नावर राजकारण करायचे? याचा प्रश्न विरोधकांना पडल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटूच नये यासाठी त्यांचा आटापिटा सुरु आहे.
मागील साडे चार वर्षापासून सातत्याने नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत असून मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून आजपर्यंत मतदार संघाचा निधी २९०० कोटीवर गेला आहे. हा निधी येत्या काळात तीन हजार कोटीच्या पुढे जाणार असून सातत्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामे होवू नये यासाठी दर दोन महिन्याला न्यायालयाचे उंबरठे झिजविले जात असून ५ नं. साठवण तलावाला कोणी कितीही विरोध केला तरी साठवण तलावाचे काम पूर्ण करून कोपरगावकरांना लवकरच नियमित पाणी उपलब्ध करून देणार आहे.
एका बाजूने विकास कामे होवू नये यासाठी खोडा घालायचा व दुसरीकडे जनतेत संभ्रम निर्माण करायचा अशी दुटप्पी भूमिका घेवून विरोधक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असून विकासाच्या आड येणाऱ्यांच्या मनसुब्यावर जनताच पाणी फेरणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.