कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : कोपरगाव विधानसभा मतदार संघात पावसाचा दीर्घकाळ खंड पडून खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आगावू २५ टक्के पीक विमा नुकसानभरपाई मिळावी यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून सोयाबीन व मका पिकाची २५ टक्के नुकसान भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली आहे.
या शेतकऱ्यांना उर्वरित ७५ टक्के नुकसान भरपाई व बाजरी, कापूस, भुईमुग तूर आदी पिकांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप २५ टक्के नुकसान भरपाई मिळालेली अशा नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषी मंत्री व मदत पुनर्वसन मंत्री यांच्याकडे मागणी करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. परंतु अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघाकडे वरून राजाने पुन्हा एकदा पाठ फिरवून खरीप हंगामात एक महिन्यापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी, कापूस, भुईमुग तूर उभी पिके जळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळून शेतकऱ्यांच्याआर्थिक अडचणी वाढल्या होत्या.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची पाहणी करावी व शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी व २५ टक्के आगाऊ पिक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, पालक मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री तसेच जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सोयाबीन व मका पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाईची ३४ कोटी १८ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.
परंतु सोयाबीन, मका पिकांचे नुकसान भरपाई पासून अजून काही शेतकरी तसेच बाजरी, कापूस, भुईमुग तूर आदी पिकांचे नुकसान झालेले शेतकरी २५ टक्के नुकसानभरपाई पासून अजूनही वंचित आहेत. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई बरोबरच उर्वरित ७५ टक्के नुकसानभरपाई देखील लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे, कृषी मंत्री ना.धनंजयजी मुंडे, मदत पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याकडे मागणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.