लोकसभेत व विधानसभेत शिवसेनेचा वाघच निवडून जाईल – उध्दव ठाकरे 

 जनसंवाद मेळाव्यात कोपरगावचे शिवसैनिक एकवटले

कोपरगाव प्रतिनिधी दि.१४ : आगामी शिर्डी लोकसभा व कोपरगाव विधानसभा निवडणुकीत फक्त शिवसेनेचा वाघच निवडून जाईल असे म्हणत माजी मुख्यमंत्री व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळे कोल्हे सह खासदार लोखंडे यांच्यावर निशाणा साधत लोखंडे यांचा खरपूस समाचार घेतला.

कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उध्दव ठाकरे बोलत होते. बुधवारी सकाळी ११ वाजता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे शहरात आगमन झाले. कोपरगावच्या पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे व खासदार संजय राऊत यांचे जंगी स्वागत केले. जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करीत ढोलताशांच्या गजरात ठाकरे यांचे खास स्वागत झाले. 

या कार्यक्रमाला शिवसेनेचे भावी उमेदवार व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, गोंदीयाचे संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, प्रमोद लबडे, शहर प्रमुख सनी वाघ, माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप वर्पे, काॅंग्रेसचे आकाश नांगरे, वंचित बहुजन आघाडीचे शरद खरात, डॉ. अजय गर्जे, सपना मोरे, भरत मोरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उध्दव ठाकरे यांनी बोलताना पुढे म्हणाले की, ज्यांची कसलीही ओळख नसताना केवळ शिवसेनेच्या नावावर शिवसैनिकांनी सदाशिव लोखंडे यांना दोनवेळा निवडून दिले. माञ, लोखंडेंनी शिवसेनेच्या भगव्याला कलंक लावून छेद देण्याचा प्रयत्न केला. भाजपने तिकिट देवून दाखवावे गद्दारी केलेल्या लोखंडाला गाडण्याचे काम शिर्डी लोकसभा मतदार संघातील सुज्ञजनता व शिवसैनिक करतील. शिवसेनेच्या बळावर दोनवेळा निवडून गेलेल्या खासदार लोखंडे गद्दारी करुन गेले आणि शिवसेना चोरली.

कोपरगाव तालुक्यातील ठाकरे गटांच्या पदाधिकारी, शिवसैनिकांमध्ये अंतर्गत गटबाजीने सेना पोखरली आहे. एकमेकांच्या विरोधात उघड-उघड संघर्ष करणारे आजी-माजी पदाधिकारी आज-माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या स्वागतासाठी हातात हात घालून ठाकरे यांचा स्वागताला एक हारामध्ये गुंफल्याने उपस्थित अनेक शिवसैनिक अचंबित झाले होते. काही का असेना ठाकरे यांच्या जनसंवाद मेळ्यातुन विरोधक शांत होण्यापेक्षा अंतर्गत गटबाजी तात्पुरती शितल झाली. 

भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना सोडून गेले होते पण शिवसेना कधी चोरली नाही. शिवसेना चोरणाऱ्या गद्दारामध्ये लोखंडे हे एक आहेत. एखाद्या वेळेस चुक झाली तर माफ करु पण गुन्ह्याला माफी नसते हे गुन्हेगार आहेत. असे म्हणत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बद्दल ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करीत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे. 

यावेळी खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत ना काळे ना कोल्हे फक्त शिवसेनेचा वाघ असणार. येथे वर्षानुवर्षे आलटुन पालटुन सत्तेत असलेल्या सत्ता सम्राटांना पिण्याचे पाणी देता आले नाही. आजही आठदिवसाड गढुळ पाणी पिण्यासाठी दिले जाते. पिण्यासाठी शुद्ध पाणी देवू शकत नाही. तर, तुमची सत्ता काय कामाची तेव्हा जर कोपरगावकरांना स्वच्छ मुबलक पाणी दररोज हवे असेल तर उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे लागेल.

असे म्हणत राऊत यांनी भाजप सह काळे, कोल्हे यांच्यावर खास शैलीत निशाणा साधला. यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना सोडून माझ्यासह मतदार संघातील जनतेचं मोठं नुकसान केले. त्या बद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. असे म्हणत आपला माणूस आपल्यासाठी सदैव कार्य करणारा मी आता सज्ज झालोय असे म्हणाले. यावेळी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ असल्याच्या भावना व्यक्त करीत शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करीत होते.