जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला शेवगावचा पाठींबा

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ :   मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे गेल्या सहा दिवसा पासून पुकारलेल्या बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ शेवगाव शहर व ताकुक्यातील सकल मराठा समाज व मराठा क्रान्ती मोर्च्याच्या वतीने शुक्रवारी (दि.१६) पुकारण्यात आलेल्या शेवगाव बंद आंदोलनास सर्व स्थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंद अतिशय शांततेत व कडकडीत पाळला गेला.

सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी गुरुवारी संध्याकाळी व शुक्रवारी सकाळीच शहरातून एकत्रित फेरी काढून व्यापाऱ्यांना शेवगाव बंदला शांततेत प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. त्यानंतर भाकप ने शेतकरी, कामगार, आशा व गटप्रवर्तक तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी शहरातून मोर्चा काढून बंद चे आवाहन करून रास्ता रोको केला. त्यामुळे शेवगाव बंद विशेष ठरला.

खर तर सरकारने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वर पुन्हा उपोषणाची वेळ आणायला नको होती, नवीमुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी आश्वासन देऊन मुंबई येथील आझाद मैदानावरील जरांगे पाटलाचे उपोषण आंदोलन स्थगित केले होते, त्याची अंमलबजावणी जर वेळेत सुरू केली असती तर आजच्या त्यांच्या उपोषणाची वेळ आली नसती. आता २० तारखे पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सग्या सोयऱ्या बाबतचे रास्त अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे व मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा मराठा समाजाच्या अधिक तीव्र आक्रोशाला सरकारला सामोरे जावे लागू शकते. बापूसाहेब गवळी ज्येष्ठ कार्यकर्ता सकल मराठा शेवगाव.