शेवगाव प्रतिनिधी,दि.१७ : शेवगाव परिसर २०१८ पासून सातत्याने दुष्काळाच्या झळाने होळपळत असून यावर्षी तर परिसराला वरदायी असलेल्या जायकवाडी जलाशयातील पाणी पातळी मागील वर्षाच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून शुक्रवारी तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी टंचाई आढावा बैठक घेऊन सर्व विभागांना आगामी काळात टंचाई परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
शुक्रवारी दि.१६ रोजी येथील पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी राजेश कदम, नायब तहसीलदार राहुल गुरव, रवींद्र सानप, पाणी पुरवठा योजनेचे उपअभियंता सानप, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांची उपस्थिती होती. परिसराचा आधारस्तंभ असणाऱ्या जायकवाडी जलाशयात सध्या पाणी पातळी वाजवी पेक्षा कमी झाली असून अद्याप उन्हाळा बाकी असल्याने संभाव्य टंचाईची परिस्थिती विचारात घेऊन ती निवारणार्थ आवश्यक असणाऱ्या बाबींचा बैठकीत आढावा घेण्यात आला.
आगामी काळात तालुक्यातील नागलवाडी, शेकटे खुर्द व बुद्रुक, गोळेगाव, थाटे, वाडगाव, लाडजळगाव, मुरमी, गदेवाडी, कुरुडगाव या गावात आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई भेडसावू शकते. तेथे टँकरची मागणी होऊ शकते. तेव्हा टँकर सुरू करण्यापूर्वी परिसरातील खासगी बोअर वा विहीर अधिग्रहित करणे बाबत अगोदरच सर्वेक्षण करण्याबाबत दक्ष रहावे.
तसेच टँकरचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्या संदर्भात देखील सर्व यंत्रणांनी समन्वयाने पाहणी करून मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने कशी मार्गी लावता येईल याबाबत तहसीलदार सांगडे यांनी यावेळी मौलिक मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी कदम यांनी प्रास्तावित केले. तर सहाय्यक गटविकास अधिकारी बापू चव्हाण यांनी आभार मानले.