खांद्यावर कावड घेत आमदार काळे कावड यात्रेत सहभागी

कोपरगाव प्रतिनिधी,दि.१० : सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या व कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला. माजी आमदार अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी यात्रोत्सवास भेट देवून श्री महेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी काढण्यात आलेल्या कावड यात्रेत आ. आशुतोष काळे खांद्यावर कावड घेवून कावड यात्रेत सहभागी झाले होते.

श्री महेश्वर महाराज जागृत देवस्थान आहे. दरवर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कोळपेवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वात मोठी यात्रा असा या यात्रेचा नावलौकिक असून वर्षभर भाविकांची मांदियाळी असते. मतदार संघातील अनेक देवस्थानांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देवून या तीर्थक्षेत्रांच्या व यात्रा स्थळांच्या विकासाला निधी दिला आहे.

त्याप्रमाणे कोळपेवाडी श्री महेश्वर देवस्थानास देखील ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देत सभामंडप बांधकाम व परिसर सुशोभिकरण करणे आदी कामासाठी ५० लक्ष निधी दिला आहे. त्यामुळे भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. श्री महेश्वर महाराजांची कृपा दृष्टी सर्वावर रहावी अशी प्रार्थना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी श्री महेश्वर चरणी केली.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोळपेवाडी ग्रामस्थ व यात्रा कमिटीने यात्रेकरूंसाठी विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित  केले आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घेतांना चुकीचे वर्तन घडणार नाही याची काळजी घ्यावी. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु असून ऊस तोडणी कामगारांची देखील श्री महेश्वर महाराजांवर मोठी श्रद्धा आहे.

यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी यात्रा कमिटीच्या वतीने चोख व्यवस्था केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त करून शांततेत यात्रा उत्सव साजरा करावा अशा सूचना देवून सर्वाना नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.