संजीवनी सैनिकी ज्यु. कॉलेजचा कबड्डी संघ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये करणार तालुक्याचे नेतृत्व

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०७ : कोपरगाव तालुका क्रीडा समितीने कोळपेवाडी येथे आयोजीत केलेल्या तालुका स्तरीय १९ वर्षे  वयोगटांतर्गत कबड्डी स्पर्धांमध्ये संजीवनी सैनिकी ज्युनियर कॉलेजच्या संघाने विविध सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश करत अटीतटीच्या अंतिम सामन्यातही विजयाची मोहर उमटुन तालुक्यात अव्वल असल्याचे सिध्द केले, अशी माहिती ज्यु. कॉलेजच्या वतीने देण्यात आली आहे.

संजीवनी ज्यु. कॉलेजचा अंतिम सामना आत्मा मालिक ज्यु. कॉलेजच्या संघाविरूध्द झाला. यात कर्णधार अमित मते याच्या नेतृत्वाखाली अनिकेत हिरे, पारस राजोळे, पार्थ खांबेकर, ओम म्हसे, चैतन्य खांबेकर, पियुष  मते, साहील राजवाडे, ऋषिकेश काटे, सचिन मोहिते, जीवन शेळके व गौरव भुजबळ यांनी प्रतिस्पर्धी संघावर कधी आक्रमक चढाई करीत तर कधी चढाई करीत आलेल्या खेळाडूची सांघिक पकड करीत पाच गुणांनी विजय खेचुन आणला. आता हा संघ अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार आहे. शास्त्र शुध्द प्रशिक्षण व योग्य सराव यामुळे संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजचे खेळाडू शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आघाडीवर असतात.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे व त्यांच्या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य डॉ. जी. बी. गायकवाड, उपप्राचार्य कैलास दरेकर, वसतीगृह अधिक्षक ज्ञानेश्वर रूमणे, क्रीडा प्रशिक्षक  उमेश उशीर व मिथुन बनसोड उपस्थित होते.