कोपरगाव गोळीबार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : विनाकारण माझी किंवा माझ्या कार्यालयातील व्यक्तींची बदनामी केली तर त्यांच्यावर बदनामीचा दावा ठोकणार. चुकीचं कृत्य करणाऱ्यांना मी कधीच पाठीशी घालत नाही. विरोधकांना सध्या विकास कामांवर बोलण्यासारखे काहीच राहीले नसल्याने ते चुकीचे आरोप करून विरोधक माझी बदनामी करीत जनतेची दिशाभूलकरीत आहेत असे मत आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले.
कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. नुकत्याच झालेल्या गोळीबारात प्रकरणांमध्ये आमदार आशुतोष काळे व त्यांचे स्वीयसाहाय्यक यांच्यावर युवानेते विवेक कोल्हे यांनी गंभिर आरोप केले होते. त्यावर उत्तर देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील साईबाबा तपोभूमी येथील सभागृहात पञकार परिषद घेवून विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला.
आमदार काळे पुढे म्हणाले की, मला जनतेने निवडून दिल्यापासुन पाच वर्षांत शक्य तीतके कामे केली. एकट्या कोपरगाव शहरासाठी साडे तीनशे कोटींचे कामे मंजूर आहेत. ३२३ कोटींची भुयारी गटारीचा प्रस्ताव पाठवला आहे. सातशे कोटींचे कामे प्रगतीपथावर आहेत. तालुक्यातील अनेक विकास कामाबरोबरच विविध प्रशासकीय इमारतींची कामे सुरु असल्याने विरोधकांना सध्या माझ्यावर बोलण्यासारखे काहीच शिल्लक नाही म्हणून बिनबुडाचे खोटे आरोप करुन बदनामी करीत आहेत.
शहरातील गोळीबार प्रकरणात आमचा कसलाही संबंध नाही. पोलीसांची चौकशी सुरु आहे त्या चौकशीत जर काही सिध्द झाले तर माझ्यावर कायदेशीर कारवाई होईल कायदा सर्वांना सारखा आहे. पदावर असणाऱ्यांना व पदावर नसणाऱ्याही. केवळ निवडणुका जवळ आल्यामुळे विरोधक असे आरोप करुन तेढ निर्माण करीत आहेत.
मी लोकप्रतिनिधी असल्याने माझ्या सोबत कोण फोटो काढतो, त्यावर काय शिर्षक लिहीतो. यावर मी काहीच नियंञण ठेवू शकत नाही. कोणाला फोटो काढू नका असं मी म्हणणार नाही. जनतेला तो अधिकार आहे असे म्हणत विवेक कोल्हे यांनी गोळीबार प्रकरणातील एका आरोपीने आमदार काळे यांना बाॅस हे शिर्षक देवून शहरात बोर्ड लावले होते त्यावरून काळेंवर आरोप केले होते त्याचे उत्तर काळे यांनी आपल्या शैलीत दिले.
यावेळी काळे पुढे म्हणाले की, कोण कोणता व्यवसाय करतो. हे मी चोवीस तास बघत बसु शकत नाही. चुकीचे धंदे करणाऱ्यांना मी कधीच पाठीशी घालत नाही. माझा स्वभाव सर्वांना माहीत आहे. पण जर कोणी चुकीचं करत असेल तसेच शहराची शांतता भंग करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. संबधीत विभागाच्या प्रशासनाने रितसर कारवाई करुन संबंधीतावर गुन्हे दाखल करावे पण केवळ राजकारण करण्यासाठी जाती धर्मातील भांडणातून काही साध्य होणार नाही. उलट द्वेष निर्माण करण्याचे काम होईल.
या पञकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, मेहमुद सय्यद, स्वप्नील निखाडे, शैलेश साबळे, दिनेश कांबळे, दिनकर खरे, फकिर कुरेशी, नवाज कुरेशी, गवळी यांच्यासह काळे यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्याकडे एमआयडीसी आली आहे जर मी एखादा कारखाना टाकुन बेरोजगारांना रोजगार दिला तर विरोधकांनी दोन ऐवजी चार कारखाने टाकुण हजारो बेरोजगारांना रोजगार दिला तर लोक त्यांचे कौतूक करतील. जो काम करेल त्याचं कौतुक होणार असे म्हणत आमदार काळे यांनी कोल्हे यांच्यावर विकास कामांवर कार्य करण्याचा इशारा दिला.