पवार पतसंस्थेत ‘डिजिटल बँकिंग’ सेवा सुरु – आमदार काळे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : काळानुरूप बदल स्वीकारून ग्राहकांपर्यंत विविध सेवा देण्यात पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्था संस्था कायम सक्षम राहीली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नातून ‘विश्वासातून प्रगतीकडे’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेने ग्राहकांना ‘डिजिटल बँकिंग’ सेवा सुरु केल्यामुळे ग्रामीण भागातील बँकेच्या ग्राहकांची मोठी सोय झाली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

सहकारी पतसंस्थेत ग्रामीण भागातील नागरिकांची विश्वास पात्र असलेल्या पद्मविभूषण डॉ शरदचंद्र पवार पतसंस्थेत आमदार काळे यांच्या हस्ते एन.ई.एफ.टी. व आर.टी.जी.एस. सुविधेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्था कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे कर्मचारी, शेतकरी, छोटे-मोठे उद्योजक यांचा आर्थिक आधारस्तंभ आहे.

संस्थेने अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना संस्थेने कर्ज देऊन त्यांच्या स्वप्नांना हातभार लावलेला आहे. त्यामुळे या व्यवसायिकांना डिजिटल बँकिंगच्या येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे निरंतर प्रगतीचे साधन समजून काळानुरूप कार्यपद्धतीत बदल केला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोविड-१९ च्या महामारीमुळे जगाची व प्रत्येक व्यक्तीच्या विचारांची पद्धत बदलली असून त्यास बँकिंग क्षेत्र देखील अपवाद नाही.

कोविड महामारी पूर्वीचं जीवनमान आणि त्यावेळचं बँकिंग प्रणाली सर्वांनी अनुभवली आहे. आपल्याकडे डिजिटल बँकिंग सेवा येण्यासाठी १५ ते २० वर्षाचा अवधी नक्कीच लागला असता परंतु कोविड महामारीमुळे हि सेवा त्यापूर्वीच आपल्याकडे आली व बँक ग्राहकांना भावली देखील त्यामुळे पतसंस्थेने ग्राहकांना ‘डिजिटल बँकिंग’ सेवा सुरु करण्याचे उचललेले पाऊल स्वागतार्ह असून सर्वच प्रकारच्या सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना आमदार काळे यांनी संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, व्हा.चेअरमन रावसाहेब चौधरी, संचालक अनिल महाले, सुदाम वाबळे, व्यंकटेश बारहाते, महेन्द्र काळे, वीरेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर हळनोर, तालिब सय्यद, चंद्रशेखर कडवे, व्यवस्थापक मंगेश देशमुख, त्यांचे सहकारी तसेच ठेवीदार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.