कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : नुकतेच झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकमठाण गावातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, मका, घास आदींसह अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून त्याचा निचरा न झाल्याने डोळ्यादेखत हाता तोंडाशी आलेली पिके नासधूस होताना बघावी लागण्याची दुर्दैवी वेळ शेतकरी बांधवांवर आली आहे. सदर नुकसानीचे पंचनामे वेळीच होणे गरजेचे होते मात्र अद्यापही प्रशासनाने पंचनामे केलेले नाही अशी स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार आशुतोष काळे हे केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी फक्त पर्यटन दौरा म्हणून अतिवृष्टीत फोटो काढण्यापुरते एखाद्या ठिकाणी गेले का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे सणासुदीच्या तोंडावर मोठे नुकसान झाल्याने आर्थिक संकट त्यांच्यावर कोसळले आहे.
शासन स्तरावरून नियमाप्रमाणे तातडीने पंचनामे होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी कार्यवाही होणे गरजेचे होते. आगामी काळात निवडणूक आचारसंहितेचे कारण देत सदर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वेळीच मिळाली नाही तर अधिकच अडचण निर्माण होणार आहे.
कोकमठाण सह परिसरातील शेतकरी आपण कोपरगाव मतदारसंघातच राहतो याचा विसर आमदार आणि प्रशासन यांना पडला आहे का असा सवाल उपस्थित करत आहेत. तलाठी ग्रामसेवक सर्कल अधिकारी यांनी पंचनामे न केल्याने तहसीलदार सावंत यांनाही सदर शेतकरी भेटले व आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने पंचनामे करून घ्यावे अशी विनंती केलेली आहे तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांनीही सदर शेतकऱ्यांना सहकार्य करा व तातडीने पंचनामे करून घ्या अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजीराव रक्ताटे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजेंद्र जोशी, चांगदेव लोंढे, सोपान रक्ताटे, मच्छिंद्र दिघे, किसन फटांगरे, संदीप लोंढे, रमेश वाघ, सुनील रक्ताटे, गौरव जोशी, अनिल रक्ताटे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.