काळेंच्या सांगता प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार) गटाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका  सौ.चैताली ताई काळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (दि.१८) रोजी कोपरगाव शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात येवून प्रचाराची सांगता करण्यात आली. यावेळी या प्रचार रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी होवून नागरिकांनी देखील या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद दिला.

कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयापासून ढोल ताशाच्या गजरात भव्य प्रचार रॅलीची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गांधीनगर,भागातील गांधी चौक व पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून धारणगाव रोड, बैल बाजार रोड, या परिसरातून भव्य शक्तीप्रदर्शन करून भव्य प्रचार फेरी पुन्हा कृष्णाई मंगल कार्यालयात येवून महायुतीच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराची सांगता झाली.

या भव्य दिव्य प्रचार रॅलीची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकांना देखी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कोपरगाव मतदार संघात आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघासह कोपरगाव शहरात उल्लेखनीय विकास कामे केलेली आहेत.त्यामुळे विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या पासून कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गावात कोपरगाव शहरातील विविध प्रभागात कॉर्नर सभा, घोंगडी बैठका, घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून आ.आशुतोष काळे यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. त्यांच्या बरोबरीत त्यांच्या अर्धांगिनी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली ताई काळे या देखील आ.आशुतोष काळे यांच्या खांद्याला खांदा लावून बैठका व  कॉर्नर सभा घेवून नागरिकांशी संवाद साधत होत्या.

त्यांच्याच नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला देखील मोठ्या संख्येने उस्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातातील आ.आशुतोष काळे यांचे कटआउटस नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते यावेळी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा उत्साह आ.आशुतोष काळेंच्या विजयाची साक्ष देत होते.

Leave a Reply